राजूरेश्वराच्या दर्शनासाठी मकरसंक्रातीनिमित्त महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:51+5:302021-01-15T04:25:51+5:30
राजूर: मकरसंक्रात सणाचे औचित्य साधून पंचक्रोशितील हजारो महिलांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करून वाण अर्पण केला. मराठवाड्यातील भाविकांचे आराध्य दैवत ...

राजूरेश्वराच्या दर्शनासाठी मकरसंक्रातीनिमित्त महिलांची गर्दी
राजूर: मकरसंक्रात सणाचे औचित्य साधून पंचक्रोशितील हजारो महिलांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करून वाण अर्पण केला.
मराठवाड्यातील भाविकांचे आराध्य दैवत म्हणून राजूरेश्वराची ओळख आहे. सण, उत्सवाला पंचक्रोशितील महिला पुरूष दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्याची परंपरा पाळतात. यावर्षी परतीच्या पावसाने रब्बीचा हंगाम समाधानकारक आहे. त्यातच सध्या शेतकºयांना शेती कामातून उसंत असल्याने महिलांची गर्दी वाढली होती. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, एका दिवसांवर मतदान आल्याने परिसरातील गावच्या उमेदवारांनी महिलांना वाहनांची सोय उपलब्ध करून देवून श्रीची दर्शनवारी घडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पंचक्रोशितून वाहनातून महिलांचे जथ्थेच्या जथ्थे राजूरात दाखल होत होते. महिला श्रीला वाण अर्पण करून एकमेकींना तिळगुळ देवून हळदी कुंकूचा सोपस्कार पार पाडतांना दिसत होत्या. मंदिर परिसरात सर्वत्र हळदी कुंकू दिसत होते. राजूरेश्वरासह विठ्ठल रूख्माईच्या मंदिरात महिलांनी गर्दी केली होती. महिलांच्या गर्दीमुळे राजूरात यात्रेचे स्वरूप आले होते.
फोटो
राजूरेश्वर मंदिर परिसरात महिलांची झालेली गर्दी.