प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी राजुरेश्वर मंदिरात गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:37+5:302021-01-08T05:42:37+5:30
राजूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी पॅनेल प्रमुखांसह उमेदवार, समर्थकांची येथील राजुरेश्वर मंदिरात गर्दी होत आहे. राजुरेश्वराचा ...

प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी राजुरेश्वर मंदिरात गर्दी
राजूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी पॅनेल प्रमुखांसह उमेदवार, समर्थकांची येथील राजुरेश्वर मंदिरात गर्दी होत आहे. राजुरेश्वराचा आणि पॅनेलचा जयघोष केला जात असल्याने मंदिर परिसर दणाणून जात आहे.
मराठवाड्यातील भाविकांचे आराध्य दैवत म्हणून राजुरेश्वर देवस्थानला ओळखले जाते. पंचक्रोशीत कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ राजुरेश्वराच्या दर्शनापासून करण्याकडे अनेकांचा कल असतो. सध्या जिल्ह्यासह परिसरात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून राजुरेश्वर मंदिरात गर्दी वाढली आहे. परिसरातील चणेगांव, तुपेवाडी, चांधई टेपली, वाघ्रळ दाभाडी, बावणे पांगरी, देळेगव्हाण, पिंपळगांव थोटे, पळसखेडा पिंपळे, लोणगांव, थिगळखेडा, चांधई ठोंबरी, केदारखेडा, जवखेडा ठोंबरे आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राजुरेश्वर मंदिरात पॅनेल प्रमुख समर्थकासह हजेरी लावत असून, राजुरेश्वराचा अभिषेक करण्यासह नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत आहेत. अन्य भाविक व प्रचारकांच्या गदीर्ने मंदिर परिसर गजबजून जात आहे.
प्रचारात हेवेदावे मांडण्यावर भर
राजूर गटातील चांधई एक्को व उंबरखेडा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुका चुरशीच्या होणार असून, प्रस्थापितांविरोधात नवतरूणांनी शडडू ठोकल्याने रंगत वाढली आहे. निवडणुकीत विकासकामापेक्षा गावातील आपापसातील अंतर्गत हेव्यादाव्यांवर प्रचारातून जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.