राजूरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:48+5:302021-02-05T07:59:48+5:30
पौष महिन्यामुळे संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय ...

राजूरेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पौष महिन्यामुळे संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. कोरोना संकटामुळे गणपती संस्थानकडून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. पौष महिन्यात महिला उपवास करून धार्मिक व्रतवैकल्य पार पाडतात. तसेच आठवडे बाजार व संकष्टी चतुर्थी एकत्र आल्याने चौहोबाजूंनी भाविकांनी राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी राजूरेश्वर चरणी माथा टेकवण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. मंदिर परिसरात विविध खेळण्यांसह नारळ प्रसाद, फळांच्या दुकानांच्या रांगा मोठ्या प्रमाणात लागल्या होत्या. व्यापाऱ्यांचे व्यवसाय तेजीत दिसत होते. भाविकांची गर्दी वाढल्याने दुपारी मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वारंवार घडत होते. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. सकाळी कमी असलेली गर्दी दुपारनंतर झपाट्याने वाढण्यास सुरूवात झाली होती. बंदोबस्तकामी हसनाबाद ठाण्याचे सपोनि. संतोष घोडके यांच्यासह पोलीस कर्मचारी तैनात होते.