जालना जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे, मटका सुरू; पोलिसांचे दुर्लक्ष..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:21 IST2018-03-05T00:20:43+5:302018-03-05T00:21:18+5:30
अवैध धंद्यांत सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी मटका व इतर अवैध धंदे मात्र जिल्ह्याच्या विविध भागांत बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.

जालना जिल्ह्यात फोफावले अवैध धंदे, मटका सुरू; पोलिसांचे दुर्लक्ष..!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैध धंद्यांत सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी मटका व इतर अवैध धंदे मात्र जिल्ह्याच्या विविध भागांत बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. यावर पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे यानिमित्त आढळून आले आहे. पूर्वीच्या पोलीस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांनी पूर्णपणे बंद केलेले अवैध धंदे सध्या सर्रास सुरु असल्याचे दिसून येत आहे.
अधिक पैशांचे आमिष दाखवून गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदाच शहरासह जिल्ह्यात जोमात सुरु आहे. जालना शहरातील बसस्थानक, भोकरदन नाका, लक्कडकोट, चंदनझिरा, एमआयडीसी, शनिमंदीर, नूतन वसाहत, गांधी चमन, रेल्वे स्थानक, मस्तगड, अलंकार टॉकिज परिसर, सिंधी बाजार, शोला चौक, गांधी नगर, मंगळ बाजार, आझाद मैदान परिसर, फूल बाजार, कन्हैयानगर, नवीन मोंढा यासह बदनापूर, शेलगाव, भोकरदन, राजूर, जाफराबाद, बाजार गेवराई, टेंभूर्णी, चिखली, केदारखेडा, रामनगर, विरेगाव, नेर, सेवली, वाटूरफाटा, मंठा, परतूर, आष्टी, सातोना, कुंभार पिंपळगाव, घनसावंगी, तीर्थपुरी, शहागड, गोंदी, अंबड, गोलापांगरी, हसनाबाद, पारध या प्रमुख गावांसह छोट्या छोट्या गावांमध्ये मटका सुरु असल्याचे आढळून येत आहे. विशेष म्हणजे मटका घेणा-या बुकींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी त्यांचे नेटवर्क अजूनही सुरुच असल्याचे दिसते. यामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असून, आजी माजी नगरसेवक व काही राजकारण्यांचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी अवैध धंद्यांना लगाम लावून कारवाईचा फास आवळला होता. त्यामुळे अवैध धंदे करणा-यांनी त्यांचे बस्तान इतरत्र मांडले होते. मात्र, सध्या आॅनलाईन लॉटरी, क्रिकेट मॅचवरील बेटिंग व मटका इ. अवैध धंदे फोफावले असून, याविरुद्ध कडक मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे.
शहरात मटका चालविणा-या १५ जणांविरुद्ध हद्दपारीच्या कारवाईमुळे या प्रकारांना आळा बसला आहे. आणखी ५० जणांवर कारवाई प्रस्तावित आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास या पुढे विशेष मोहीम राबवून कारवाई केली जाईल, असे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गोर यांनी सांगितले.
शहरातील विविध भागांत करमणूक केंद्राच्या नावाखाली अवैध आॅनलाईनचा लॉटरी व्यवसाय सर्रास सुरु असून, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी अशा प्रकारच्या जुगाराच्या आहारी जात असल्याचे लोकमतने स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आणले. याची दखल पोलिसांनी घेतली. मात्र, ५० पैकी जवळपास २८ केंद्रांचा पंचनामा करण्यात आला. तो केवळ देखाव्यापुरताच असल्याचे दिसून आले. कुठलाही शासन परवाना नाही, शासन कराचा भरणा नसताना याला क्लीनचिट देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. गत दिवस शहरातील विविध आॅनलाईन लॉटरी सेंटर्स बंद होती. ती रविवारपासून सुरु झाल्याचे आढळून आले.