स्वतंत्र विदर्भाच्या धोरणाला माकपचा विरोध
By Admin | Updated: October 9, 2014 00:36 IST2014-10-09T00:13:26+5:302014-10-09T00:36:51+5:30
जालना : महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु या धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध असून जनतेत फूट पाडून राजकारण करण्याचा भाजपाचा डाव जनतेने

स्वतंत्र विदर्भाच्या धोरणाला माकपचा विरोध
जालना : महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु या धोरणाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा विरोध असून जनतेत फूट पाडून राजकारण करण्याचा भाजपाचा डाव जनतेने उलथवून टाकून माकपच्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन पक्षाच्या केंद्रीय नेत्या माजी खासदार सुभाषिनी अली यांनी केले. काँग्रेस, भाजपा, राकाँ व शिवसेना हे चारही पक्ष सारखेच असल्याचा आरोप त्यांनी केला.
परतूर विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार मारोती खंदारे यांच्या प्रचार सभेत अली बोलत होत्या.
आपल्या भाषणात अली पुढे म्हणाल्या की, मोदी सरकारने पहिल्या शंभर दिवसातच आपला पोकळपणा सिद्ध केला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत मोदींनी आश्वासनांची खैरातबाजी केली. परंतु प्रत्यक्षात सरकार आल्यानंतर शंभर दिवसात काहीच केले नाही. याउलट महागाई वाढली, भारतीय सीमेवर पाकच्या सैन्याकडून गोळीबार सुरू असताना पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात प्रचार सभांमध्ये व्यस्त आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा, सेना हे चारही पक्ष म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या पक्षांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे सांगून मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी माकपच्या उमेदवारास विजयी करावे, असे आवाहन अली यांनी केले.
सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णा सावंत होते. यावेळी उमेदवार मारोती खंदारे, मधुकर मोकळे, सरिता शर्मा, गोविंद आर्दड, कांता मिटकरी, नंदकिशोर प्रधान आदींची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी)