न्यायालयाने संवेदनशीलपणे काम करावे - न्यायमूर्ती नलवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST2021-02-22T04:20:20+5:302021-02-22T04:20:20+5:30
अंबड : न्यायालयाने शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे, अनेक शासकीय योजना उपयुक्त आणि चांगल्या आहेत. त्या लोकांपर्यंत ...

न्यायालयाने संवेदनशीलपणे काम करावे - न्यायमूर्ती नलवडे
अंबड : न्यायालयाने शासनाच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे, अनेक शासकीय योजना उपयुक्त आणि चांगल्या आहेत. त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. त्यासाठी संवेदनशीलपणे न्यायालयाने काम करण्याची गरज आहे. न्यायाधीशांनी सामान्य लोकांचा विचार समोर ठेवून न्यायदानाचे काम करावे. गरीब लोकांसाठी न्यायालयाने काम करावे, असेही प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ता.वी. नलवडे यांनी केले.
अंबड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे, न्यायमूर्ती ता.वी. नलवडे, जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले, न्यायाधीश भगुरे यांची उपस्थिती होती. न्यायमूर्ती नलवडे यांच्या हस्ते न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन झाले.
पुढे बोलताना न्यायमूर्ती नलवडे म्हणाले की, आपल्या गावाजवळ न्यायालय आल्यामुळे पक्षकारांना सोयीचे झाले आहे. या न्यायालयातून न्यायाधीशांनी न्यायनिवाडे शीघ्र गतीने करावेत. प्रत्येक तालुक्यात न्यायालय स्थापन झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय दूर झाली आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी केले. त्या म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री राजेश टोपे हे अंबड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुरू करण्यासाठी न्याय प्राधिकरणाकडे पाठपुरावा करीत होते. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे त्या म्हणाल्या. या वेळी अॅड. मंत्री, अॅड. संभाजी टोपे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. आभार अंबड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. घायतडक यांनी मानले.
विधिज्ञांनी सर्वसामान्य पक्षकारांना न्याय देण्याचे काम करावे - टोपे
न्यायालयात भौतिक सोयी-सुविधा व गरजा पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. न्याय आपल्या दारी या भूमिकेने सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत सर्वसामान्य पक्षकारांना न्याय देण्याचे काम विधिज्ञांनी करावे. भौगोलिक दृष्टीने अंबड, घनसावंगी तालुके मोठे आहेत. तालुक्यातील लोकांना न्यायालयीन कामासाठी जालना शहरात जावे लागत होते. म्हणून आपण पाठपुरावा करून येथे अतिरिक्त सत्र न्यायालय उभारले आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले.