कोरोना लसीकरण : आजपासून बुस्टर डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:29 IST2021-02-13T04:29:48+5:302021-02-13T04:29:48+5:30
कोरोना जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. आज जरी कोरोना आटोक्यात आला आहे, असे वाटत असले, तरी पुन्हा ...

कोरोना लसीकरण : आजपासून बुस्टर डोस
कोरोना जागतिक महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. आज जरी कोरोना आटोक्यात आला आहे, असे वाटत असले, तरी पुन्हा एकदा जालन्यात हळूहळू का होईना रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरणाचा शुभारंभ झाला होता. कोविन ॲपवर जवळपास १२ हजार जणांनी नोंदणी केली होती. त्यात प्रामुख्याने आरोग्य कर्मचारी होते. नंतर, आता ही लस खाजगी डॉक्टर तसेच महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांना दिली जात आहे.
ही लस दोन टप्प्प्यांत देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्यांनी १६ जानेवारीला लस घेतली आहे, त्यांना आता बुस्टर डोस म्हणजेच लसीकरणाचा दुसरा टप्पा देण्यात येणार आहे. यासाठी अनेकांना मोबाइलवर मेसेज पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हे जरी खरे असले तरी अनेक जण ही लस घेण्यासाठी धजावत नसल्याचे पुढे आले आहे. हा गैरसमज दूर करावा म्हणून खुद्द जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्यासह अन्य खाजगी डॉक्टरांनी लस घेतली आहे. ही लस घेण्याआधी त्यांनी त्यांच्या ॲण्टीबॉडीजची तपासणी केली होती आणि लसीकरणानंतर केलेल्या तपासणीत मोठा सकारात्मक फरक दिसून आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्यातील २४ वेगवेगळ्या केंद्रांवर हे लसीकरण सुरू असून, साधारणपणे ११ हजार ३०० पेक्षा अधिक जणांना ही लस देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
बुस्टर डोससाठी तयारी
बुस्टर डोस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. ज्यांनी कोविन ॲपवर नोंदणी केली आहे, अशांना लवकरच मेसेज दिले जाणार आहेत. हे मेसेज आल्यावर त्यांना पुन्हा पूर्वीप्रमाणेच लस घ्यावी लागणार आहे. हा बुस्टर डोस दिल्यास प्रतिकारशक्ती अर्थातच ॲण्टीबॉडीज वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे लसीकरणाचा दुसरा टप्पादेखील तेवढाच महत्त्वाचा आहे.