शहरात कोरोनाचा उद्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST2021-02-17T04:37:19+5:302021-02-17T04:37:19+5:30
जालना : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गत १६ दिवसात जिल्ह्यात ४३८ रुग्ण आढळले आहेत. यात जालना ...

शहरात कोरोनाचा उद्रेक
जालना : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गत १६ दिवसात जिल्ह्यात ४३८ रुग्ण आढळले आहेत. यात जालना शहरातील तब्बल २१० रुग्णांचा समावेश आहे. तर मंगळवारी एकाच दिवशी ५५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी शहरातील बाजारपेठेत मात्र कोरोनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. विशेषत: प्रशासकीय अधिकारीही नियमांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता दिली जात आहे. विविध व्यवसाय, उद्योग सुरू झाले असून, शाळाही सुरू झाल्या आहेत. जानेवारी अखेरपर्यंत कमी प्रमाणात आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यात चांगलीच वाढू लागली आहे. गत १६ दिवसांमध्ये जिल्ह्यात एकूण ४३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील २१० रुग्ण हे जालना शहरातील आहेत. विशेषत: मंगळवारी चालू महिन्यात सर्वाधिक ५५ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मंगळवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जालना शहरातील ३० जणांचा समावेश आहे. तर परतूर तालुक्यातील वाटूर फाटा- १, घनसावंगी शहर- ४, मोहापुरी- १, अंबड शहर- ५, धनगर पिंप्री- १, पिटोरी शिरसगाव येथील एकाला काेरोनाची बाधा झाली आहे. बदनापूर तालुक्यातील भुतेगाव येथील एक, भोकरदन तालुक्यातील वरंजळा- १, पिंपळगाव- १, तडेगाव येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर बुलडाणा जिल्ह्यातील ७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान, एकीकडे जालना शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाकडून मास्कचा वापर, बाजारपेठेतील सुरक्षित अंतर, दुकानांमध्ये सॅनिटायझरचा वापर यासह इतर प्रशासकीय नियमांची अंमलबजावणी सक्तीने व्हावी, यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. कोरोनाचा उद्रेक पुन्हा झाला तर टाळेबंदीत पुन्हा सर्वसामान्यांना अडकावे लागणार आहे.
३७५ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात आजवर १४ हजार १८७ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. उपचारादरम्यान त्यातील ३७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णालयातील यशस्वी उपचारानंतर १३ हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
लसीकरण संथगतीने
कोरोना लसीकरणात पहिल्या टप्प्यात कोरोना वीरांना लस दिली जात आहे. परंतु, प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे ही लसीकरण मोहीम संथगतीने सुरू आहे. दैनंदिन २ हजारांवर उद्दिष्ट असताना केवळ ४०० जणांना डोस दिला जात असून, केवळ १४ टक्क्यापर्यंत टार्गेट पूर्ण केले जात आहे. ही बाब पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
दिनांक एकूण बाधित जालना शहर
१ फेब्रुवारी २१ ०२
२ फेब्रुवारी १३ ०६
३ फेब्रुवारी ०७ ०४
४ फेब्रुवारी १७ ०९
५ फेब्रुवारी २३ ११
६ फेब्रुवारी २१ १२
७ फेब्रुवारी २९ १२
८ फेब्रुवारी २० १२
९ फेब्रुवारी ३९ २४
१० फेब्रुवारी ३२ ०९
११ फेब्रुवारी ४४ २०
१२ फेब्रुवारी ४५ २५
१३ फेब्रुवारी ०७ ०५
१४ फेब्रुवारी ४३ १५
१५ फेब्रुवारी २२ १४
१६ फेब्रुवारी ५५ ३०
एकूण ४३८ २१०