कोरोनामुळे शाळेची मैदाने पुन्हा सुनेसुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:41 IST2021-02-27T04:41:27+5:302021-02-27T04:41:27+5:30
टेंभुर्णी- मागील २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ च्या शाळांना प्रारंभ झाला होता. शाळा सुरू होऊन अद्याप एक महिनाही ...

कोरोनामुळे शाळेची मैदाने पुन्हा सुनेसुने
टेंभुर्णी- मागील २७ जानेवारीपासून वर्ग ५ ते ८ च्या शाळांना प्रारंभ झाला होता. शाळा सुरू होऊन अद्याप एक महिनाही झाला नव्हता की, पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. प्रशासनाने जिल्ह्यातील वर्ग ५ ते ८ चे वर्ग २४ फेब्रुवारीपासून बंद केले आणि एक महिन्यापासून गजबजलेली शाळेची मैदाने पुन्हा सुनीसुनी दिसू लागली.
सन २०२०- २०२१ या शैक्षणिक वर्षात प्रारंभीच जवळपास ८ महिने शाळा बंद राहिल्या. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या काळात केवळ ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. काही ठिकाणी शिक्षकांनी गृहभेटीद्वारे ऑफलाईन शिक्षणही दिले. मागील काही दिवसांत कोरोना प्रादुर्भाव निवाळल्याने शाळा उघडण्यासाठी आशादायी वातावरण दिसू लागले होते. त्याचीच परिणीती म्हणून ९ वी १२ वी च्या वर्गानंतर ५ वी ते ८ वी च्या वर्गांनाही प्रारंभ झाला. भरपूर सुट्या मिळाल्याने कंटाळलेले विद्यार्थी मोठ्या उत्साहाने शाळेत आले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळा सुरू झाल्या. शिक्षकही मोठ्या उत्साहाने अध्यापन करीत होते. मात्र विद्यार्थी- शिक्षकांचा हा उत्साह फार दिवस टिकला नाही.
सध्या संपूर्ण जिल्ह्यातील वर्ग ५ ते ८ च्या शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दुखी मनाने का होत नाही सर्वांना हा आदेश स्वीकारावाच लागला आहे. आता लवकरच स्थिती पूर्ववत होऊन पुन्हा शाळा सुरू व्हाव्यात, अशी आशा विद्यार्थी, शिक्षक व पालकांना लागली आहे.