जिल्ह्यातील १२ हजार २७५ शिक्षकांची होणार कोरोना तपासणी; तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:32 IST2021-01-19T04:32:57+5:302021-01-19T04:32:57+5:30
जालना : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याबाबतचे शासन आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. ...

जिल्ह्यातील १२ हजार २७५ शिक्षकांची होणार कोरोना तपासणी; तयारी सुरू
जालना : पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याबाबतचे शासन आदेश जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. शाळेची घंटा वाजणार असल्याने पाचवी ते आठवीच्या १२ हजार २७५ शिक्षकांची कोरोना तपासणी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.
लॉकडाऊन शिथिलतेनंतर जिल्ह्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांमध्ये सत्तर टक्क्यांच्या आसपास विद्यार्थ्यांची उपस्थिती राहत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण यासह इतर बाबींसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी शासनस्तरावरून निधीचीही उपलब्धता झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शाळांमध्ये उपाययोजनांसह साहित्याची या निधीतून उपलब्धता करून दिली जाणार आहे. याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.
तालुकानिहाय शिक्षक
जालना ३३६७
बदनापूर ११८७
अंबड १४३७
घनसावंगी १०८२
परतूर १११७
मंठा ०८४९
भोकरदन २१६६
जाफराबाद १०७०
तपासणीची तयारी
यापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू करतानाही शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्याच धर्तीवर पाचवी ते आठवीच्या शिक्षकांचीही कोरोना तपासणी केली जाणार आहे.
मोठी शाळा असेल तर तेथील अर्ध्या शिक्षकांची पहिल्या टप्प्यात आणि अर्ध्या शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यात तपासणी केली जाणार आहे. द्विशिक्षकी शाळेबाबतही अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे. शिवाय शाळेत विद्यार्थ्यांचीही आरोग्य तपासणी होणार आहे.
सूचनांचे पालन होईल
शासनाने दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. त्या दृष्टीने आम्ही तयारी करीत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सर्व सूचनांचे पालन शाळांमध्ये केले जाईल.
- कैलास दातखीळ
शिक्षणाधिकारी
जिल्ह्यातील विद्यार्थी संख्या
१४९३१८
जिल्ह्यातील शिक्षक संख्या
१२२७५