कोरोनामुळे मनोरुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:01 IST2021-02-05T08:01:58+5:302021-02-05T08:01:58+5:30
जालना : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेक कंपन्यांना टाळे लागले. कोणाची नोकरी गेली, तर कोणाचा व्यवसाय ठप्प झाला. ...

कोरोनामुळे मनोरुग्ण वाढले
जालना : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि अनेक कंपन्यांना टाळे लागले. कोणाची नोकरी गेली, तर कोणाचा व्यवसाय ठप्प झाला. शेतीवरही अस्मानी संकटांचा कहर सुरूच आहे. परिणामी, तणावात गेलेले अनेक नागरिक सध्या जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत आहेत. जानेवारी महिन्यात ६३७ जण उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते.
सध्या विविध कारणांनी मानसिक तणावात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञांकडे गत चार महिन्यांत तब्बल २,२३४ जणांनी उपचार घेतले आहेत. ऑक्टोबर, २०२० मध्ये नवीन २३ तर जुन्या ४५८ जणांनी उपचार घेतले. नोव्हेंबरमध्ये नवीन ४२ तर जुन्या ४९२ जणांनी उपचार घेतले. डिसेंबरमध्ये नवीन ५८ तर जुन्या ५२६ जणांनी उपचार घेतले, तर जानेवारीत नवीन ६५ व जुन्या ५७० जणांनी उपचार घेतले आहेत. वरील चार महिन्यांच्या कालावधीत १४ जणांनी जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात ॲडमिट होऊन उपचार घेतले आहेत. गत चार महिन्यातील आकडेवारी पाहता, मानसोपचार तज्ज्ञांकडे येणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
चिंताग्रस्तता, उदासीनता वाढली
सध्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये चिंताग्रस्तता, उदासीनता वाढू लागल्याच्या अधिक तक्रारी आहेत. यात अवास्तव भीती वाटणे, गर्दीची भीती वाटणे, एकटे वावरण्याची भीती वाटणे, न टाळता येणारे विचार सतत मनात येणे, सतत उदास वाटणे, खूप झोप येणे किंवा झोप न येणे, भूक कमी होणे, आत्महत्येचे विचार मनात येणे अशा विविध मानसिक समस्या असल्याच्या तक्रारी रुग्णांमध्ये वाढत असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनामुळे अनेक काळ नागरिकांना स्वत:ला घरात कोंडून घ्यावे लागले. उद्योग, व्यवसाय, नोकरीवरही परिणाम झाला. त्यामुळे काही नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. ओपीडीत नवीन येणारे रुग्ण असोत किंवा उपचारासाठी नियमित येणारे रुग्ण असोत, त्यांच्या समस्या जाणून घेऊन उपचार केले जात आहेत. आपल्या घरात कोणी मानसिक आजारी असेल, तर त्यावर तत्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.
- डॉ. संदीप लहाने, मानसोपचार तज्ज्ञ
जानेवारी महिन्यात मनोरुग्णालयात भरती रुग्ण
६३७
उपचारासाठी आलेले नवे रुग्ण ६५
नियमित उपचारासाठी येणारे रुग्ण ५७०
चार महिन्यांत ॲडमिट झालेले रुग्ण १४