कोरोनामुक्त ग्रामपंचायतींचा होणार गौरव : टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:35 IST2021-07-14T04:35:20+5:302021-07-14T04:35:20+5:30
जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन ...

कोरोनामुक्त ग्रामपंचायतींचा होणार गौरव : टोपे
जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपविभागीय अधिकारी संदीपान सानप, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी कोरडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, कल्याणराव सपाटे, डॉ. संजय जगताप, नगर परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न व औषध विभागाच्या अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात कोविडमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या तपासणीवेळी ८० टक्के गुण हे लसीकरणासाठी, १० टक्के गुण हे आरटीपीसीआर व अँटिजन तपासणी व १० टक्के गुण हे कोविडच्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सुरक्षित अंतराचे पालन या बाबींचे कटाक्षाने पालन करण्यासाठी देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन या प्रमाणे २४ ग्रामपंचायतींची व जिल्हास्तरावर एक अशा एकूण २५ ग्रामपंचातींची निवड करण्यात येणार असून १५ ऑगस्ट रोजी या ग्रामपंचायतींना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होताना दिसत असून, त्यांची संख्या वाढविण्याची गरज आहे. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात. जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोरोनाची लक्षणे असतील, अशा प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचनाही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या.