‘खिडकी’ गाठण्यासाठी ग्राहकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST2021-02-05T08:03:50+5:302021-02-05T08:03:50+5:30
परतूर : शहरातील एसबीआय बँकेत सुरू करण्यात आलेल्या ‘खिडकी’जवळ जाण्यासाठी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: महिला व ...

‘खिडकी’ गाठण्यासाठी ग्राहकांची कसरत
परतूर : शहरातील एसबीआय बँकेत सुरू करण्यात आलेल्या ‘खिडकी’जवळ जाण्यासाठी ग्राहकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: महिला व वयोवृद्धांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियात दिवसेंदिवस गोंधळ वाढत आहे. या बँकेचा अर्ध्याहून अधिक कारभार हा बाहेरच चालत आहे. यातच ग्राहकांची वाढलेली संख्या व अपुरे कर्मचारी यामुळे या ग्राहक बँकेच्या कारभाराला वैतागले आहेत. बँकेचे कामकाज बाहेरील चारपाच खिडक्यांतून चालते. या खिडक्यांच्या तोंडावर लाकडी दांड्या बांधण्याची शक्कल या बँक व्यवस्थापनाने लढवली आहे. याचे कारण ग्राहक व संबंधित कर्मचारी अधिक जवळ येऊ नये, असे आहे. परंतु, या बांधलेल्या लाकडाखालून खिडकीजवळ गेल्याशिवाय कामच होत नाही. प्रत्येक ग्राहकास या लाकडाखालून वाकून खिडकी गाठावी लागत आहे. यामध्ये वृद्ध व महिला ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे.
कर्मचा-यांची अरेरावी
या बँकेत ग्राहकांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ग्राहक काही विचारणा करण्यास गेले असता त्यांना कर्मचारी अरेरावी करीत आहेत. तसेच थकीत पीक कर्जासाठी एक योजना रबवण्यात येत आहे. यातही मोठा गोंधळ सुरू असून, शेतक-यांना वेगवेगळे नियम दाखवून त्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहेत. याकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कॅप्शन : परतूर येथील एसबीआय बँकेतील खिडकीजवळ जाण्यासाठी ग्राहकांना अशी कसरत करावी लागते.