भाड्याच्या खोलीत ठेवला जातो जप्त केलेला मुद्देमाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:29 IST2021-03-18T04:29:35+5:302021-03-18T04:29:35+5:30
जालना : शहरातील अन्न व औषध प्रशासन विभागाला मालकीची इमारत नाही. परिणामी या विभागाने जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यातच ...

भाड्याच्या खोलीत ठेवला जातो जप्त केलेला मुद्देमाल
जालना : शहरातील अन्न व औषध प्रशासन विभागाला मालकीची इमारत नाही. परिणामी या विभागाने जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यातच ठेवण्याची वेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येत आहे.
अवैध गुटखा विक्री रोखणे, खाद्यपदार्थांसह औषधांची तपासणी करणे, काही ठिकाणी त्रुटी आढळल्या किंवा अवैध मुद्देमाल आढळला तर तो जप्त करून पुढील कायदेशीर कार्यवाही या विभागाच्या वतीने केली जाते. परंतु, हे कार्यालयच भाड्याच्या खोलीत सुरू असल्याने जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्याचा प्रश्न सतत उभा राहतो. त्यामुळे बहुतांश वेळा पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केल्यानंतर जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यातच ठेवला जातो. मुद्देमाल कमी असेल तर तो उपलब्ध होणाऱ्या जागेत ठेवला जातो. शासनाकडून सध्या या कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी साडेआठ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या बांधकामात गोडाऊनसाठीही तरतूद करण्यात आली आहे. परंतु, या कार्यालयाची इमारत उभी होईपर्यंत तरी जप्त मुद्देमाल ठेवताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची कसरत होणार आहे.
जप्त साठा ठेवण्यासाठी जागा नाही
अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय भाड्याच्या खोलीत सुरू आहे. त्यामुळे या विभागाला जप्त केलेला मुद्देमाल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही.
विशेषत: मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्याची वाहतूक करण्यासाठीही वाहन उपलब्ध नाही. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्यात मुद्देमाल ठेवला जातो.
या कार्यालयाच्या नूतन इमारतीसाठी निधी मंजूर असून, या बांधकामात गोडाऊनचे बांधकाम करण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
वर्षभरात जप्त केलेला गुटखा
अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाच्यावतीने गत वर्षभरात ५२ कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवायांमध्ये सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पंचांच्या उपस्थितीत डंपिंग ग्राऊंडवर गुटख्यासह इतर मुद्देमालाचे दहन केले जाते.
अनेकवेळा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब झाला तर तो मुद्देमाल संबंधित ठिकाणीच पडून असतो.
लवकरच कार्यालयाचे बांधकाम सुरू होईल
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नियमितपणे अवैधरित्या गुटखा विक्रेत्यांसह इतर विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. सध्या कार्यालय भाड्याच्या खोलीत असून, उपलब्ध हाेणाऱ्या जागेत जप्त केलेला मुद्देमाल ठेवला जातो. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. आमच्या कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी जवळपास साडेआठ कोटींचा निधी मंजूर असून, लवकरच त्याचे बांधकामही सुरू होईल.
निखिल कुलकर्णी, अन्न सुरक्षा अधिकारी, जालना
अन्न व औषध प्रशासनाच्या २०२० मध्ये केलेल्या कारवाया
जानेवारी ००
फेब्रुवारी ०२
मार्च ०४
एप्रिल ०६
मे ०५
जून १८
जुलै १०
ऑगस्ट ०३
सप्टेंबर ००
ऑक्टोबर ००
नोव्हेंबर ०५
डिसेंबर ००