केंद्राद्वारे लोणचे प्रशिक्षणाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:39 IST2021-06-16T04:39:52+5:302021-06-16T04:39:52+5:30
शेतकरी चिंतेत जालना : जालना शहर परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारली. परिणामी, सुरुवातीलाच पिकांची लागवड ...

केंद्राद्वारे लोणचे प्रशिक्षणाचे आयोजन
शेतकरी चिंतेत
जालना : जालना शहर परिसरात दमदार हजेरी लावलेल्या पावसाने अचानक दडी मारली. परिणामी, सुरुवातीलाच पिकांची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना आता चिंत्ता सतावत आहे. नुकत्याच उगवलेल्या पिकांना हंडा व बादलीने पाणी देण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.
जांबसमर्थ येथे पेरणीची लगबग
घनसावंगी : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थसह परिसरातील शेत शिवारात सध्या शेतकऱ्यांची खरीप पेरणीची लगबग सुरू आहे. यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. जांबसमर्थ परिसरातील घानेगाव, कोठला, विरेगव्हाण, मासेगाव, घोन्सी परिसरात गत दोन दिवसांपूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे पेरणीसाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
मांजरगाव शिवारातून बैलजोडी लंपास
बदनापूर : मांजरगाव शिवारात शेतातील गोठ्यात बांधलेली बैलजोडी चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी रविवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी शेख नय्युम शेख सत्तार यांच्या मांजरगाव शिवारातील शेतामधील गोठ्यात बांधलेली बैलाची जोडी चोरट्याने शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरून नेली आहे. या बैलाजोडीची किंमत ६० हजार रुपये होती.
भाकरवाडी शिवारात एकास मारहाण
बदनापूर : भाकरवाडी शिवारात किरकोळ भांडणाच्या वादातून एकास काठी व दगडाने मारून जखमी केल्याप्रकरणी दोघा जणांविरुध्द रविवारी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाकरवाडी येथील फिर्यादी नारायण भीमराव तुपे यांचा संशयित प्रवीण अहिलाजी गायकवाड व दीपक गायकवाड यांच्यासोबत वाद झाला होता.
अध्यक्षपदी गणेश बोबडे यांची निवड
जालना : जालना जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या नवीन अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली. शहरातील गणेश बोबडे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून, ही निवड संस्थापक अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी केली आहे, तर मोईज अन्सारी यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी विकास काळे, आनंद अग्रवाल, महेश उफाड, ज्ञानेश्वर नलगे, संदीप अग्रवाल, शेख सलीम, राजेश ढीलपे, शेख इब्राहिम यांची उपस्थिती होती.
वेळेवर पीककर्ज देण्याची मागणी
जालना : तालुक्यातील रामनगर, विरेगाव, नेर परिसरातील अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीककर्ज मिळाले नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते अर्जुन काळे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सांगितले आहे की, खरीप हंगामाची पेरणी तोंडावर आली आहे. शेतकरीवर्ग मागील वर्षी अतिवृष्टीमुळे व यावर्षी कोरोना संकटाने आर्थिक अडचणीत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.