स्वच्छता अभियानावर समितीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:17 IST2017-12-29T00:17:40+5:302017-12-29T00:17:49+5:30
शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

स्वच्छता अभियानावर समितीची नजर
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसहभागाशिवाय कुठलीही योजना वा उपक्रम यशस्वी होत नसल्याचा पूर्वानुभव पाहता स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानात जालना शहराचा ठसा उमटविण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने कंबर कसली आहे. शहर कचरामुक्त करण्यासाठी वॉर्डनिहाय कमिटी स्थापन करुन अभियान यशस्वी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वॉर्डांतील कमिटीच स्वच्छतेवर लक्ष ठेवणार असून, स्वच्छता अॅपवर तक्रारींसाठी नागरिकांना आवाहन केले जाणार आहे.
शहरात मागील निवडणुकीवेळी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली असून, आता लोकसंख्येनुसार ६१ वॉर्ड निर्माण करण्यात आले आहेत. गतवर्षीची निवडणूक प्रभागनिहाय घेण्यात आली असली तरी स्वच्छतेची कामे, ही वॉर्डनिहाय केली जाणार आहेत.
स्वच्छ महाराष्ट्र स्वच्छ अभियान राबविले जात आहे. यासाठी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला जात आहे. या निधीतून कंत्राटी पद्धतीने अधिकारी, कर्मचाºयांची भरती आणि स्वच्छतेचे साहित्य व सामुग्री खरेदी केली जात आहे.
केंद्र शासनाने स्वच्छतेच्या आॅनलाईन तक्रारीसाठी अॅपही विकसित केले आहे. याद्वारे नागरिकांना आपल्या भागातील स्वच्छतेबाबत तक्रारी नोंदविण्याची सुविधा आहे. जालना पालिकेने एक पाऊल पुढे टाकत स्वच्छता अभियानात नागरिकांना सहभागी करुन अभियान यशस्वी करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील ६१ वॉर्डांत स्वतंत्र कमिट्या तयार करण्यात येणार असून, याची जबाबदारी त्या त्या वॉर्डातील नगरसेवकावर सोपवली जाणार आहे. वॉर्डाची भौगोलिक व इत्थंभूत माहिती नगरसेवकास असल्याने स्वच्छतेची कामे त्यानुसार केली जाणार आहेत. वॉर्डात किती हॉटेल्स, दुकाने, हॉस्पिटल्स, शाळा व वसाहती आहेत, याची माहिती नगरसेवकांना असते. त्यामुळे स्वच्छतेचे काम योग्य रीतीने होऊ शकणार आहे. सर्वपक्षीय नगरसेवक आणि प्रशासनातील अधिकारी एकत्र आले तर स्वच्छता अभियान यशस्वी होऊन शहराचा लौकिक सर्वदूर पोहोचणार आहे.