फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST2021-01-08T05:39:37+5:302021-01-08T05:39:37+5:30
विविध प्रकारचे दुकाने, शिबिरे, संस्था, कार्यालयांसह वाढदिवसाचे विविध फलक शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत भागातील सार्वजनिक ठिकाणी झळकताना दिसून येत ...

फुकट्या जाहिरातदारांमुळे शहर विद्रुप
विविध प्रकारचे दुकाने, शिबिरे, संस्था, कार्यालयांसह वाढदिवसाचे विविध फलक शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत भागातील सार्वजनिक ठिकाणी झळकताना दिसून येत आहेत. येथील नगर पालिकेतील पॅनलवर जवळपास १२ ते १३ सदस्य असून, हे सदस्य पालिकेकडे कराचा भरणा करून नियोजित स्थळी डिजिटल फलक लावून जाहिराती करतात. परंतु, कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेकांनी या कराचा भरणा केलेला नाही. लाॅकडाऊन शिथिलतेनंतर शहरातील विविध भागात हे फलक झळकताना दिसून येत आहे. अनधिकृतपणे जाहिराती केल्या जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. पालिकेतील मालमत्ता कर विभागाच्या वतीने डिजिटल फलकाचा कर भरण्याबाबत संबंधितांना नोटीसा दिल्या आहेत. नोटिसांचा भरणा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
शहरात अनधिकृतरित्या डिजिटल लावणाऱ्यांविरूध्द यापूर्वी पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे.
कोरोनातील लॉकडाऊन शिथिलतेनंतर अनेकांनी कराचा भरणा न करताच शहराच्या विविध भागात डिजिटल फलक लावून जाहिराती करण्यास सुरूवात केली आहे.
कराची वसुली होण्यासाठी पालिकेने नोटीसा दिल्या आहेत. असे असले तरी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
होर्डिंगमधून पालिकेची कमाई
जालना नगर पालिकेने सार्वजनिक ठिकाणी डिजिटल फलक लावण्यासाठी वार्षिक ३१ रूपये स्क्वेअरफूट दर निश्चित केला आहे. या माध्यमातून नगर पालिकेला वार्षाकाठी जवळपास १२ ते १३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळते. डिजिटल लावणाऱ्यांशी समन्वय साधून कर विभागाकडून कराची वसुली अधिकाधिक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
शहरातील सार्वजनिक ठिकाणी, पालिकेच्या जागेवर डिजिटल फलक लावण्यासाठी दर निश्चित केले आहेत. ज्यांनी अनधिकृत डिजिटल लावले आहे त्यांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रभाकर बोरडे, कर विभाग
प्रमुख (मामत्ता), नगर पालिका
शहरातील विविध भागात अनेकांनी अनधिकृत डिजिटल बॅनर लावले आहेत. डिजिटल बॅनर लावून जाहिरातबाजी करणाऱ्यांकडून कराची वसुली करणे गरजेचे आहे. जे लोक कराचा भरणा करणार नाहीत, अशांवर कारवाई होण्याची गरज आहे.
- सुभाष बोरडे, तालुकाध्यक्ष,
आम आदमी पार्टी