वाहतूक कोंडीमुळे शहरवासीय त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:06 IST2021-02-05T08:06:17+5:302021-02-05T08:06:17+5:30
जालना : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वार व बाह्यद्वारावर वाहतूक कोंडीचा विषय नित्याचाच झाला आहे. बसस्थानकात बस नेताना व बसस्थानकातून बस ...

वाहतूक कोंडीमुळे शहरवासीय त्रस्त
जालना : शहरातील बसस्थानक प्रवेशद्वार व बाह्यद्वारावर वाहतूक कोंडीचा विषय नित्याचाच झाला आहे. बसस्थानकात बस नेताना व बसस्थानकातून बस बाहेर काढताना चालकांना कसरत करावी लागत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जालना येथील बसस्थानकात सतत अनेक बसेस दाखल होतात. शहरी, ग्रामीण भागाला जोडणाऱ्या आणि लांब पल्ल्याच्या बसेसही येथून ये- जा करीत असल्याने येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. परंतु, या बसस्थानकासमोर गत अनेक दिवसांपासून होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे. बसस्थानकात बस नेताना विशेषत: बसस्थानकातून बस बाहेर काढताना बस चालकांना मोठी कसरत करावी लागते. बस बाहेर येत असल्याचे दिसत असतानाही अनेक वाहन चालक बसच्या आडवे जात आहेत. त्यामुळे अपघाताचाही धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही बाब पाहता वाहतूक शाखेचा एक कर्मचारी या भागात कायम नियुक्त करण्याची गरज आहे. दरम्यान, शहरांतर्गत भागातील गांधी चमण, शनी मंदिर, कचेरी रोडवरही वाहतुकीची सतत कोंडी होत आहे. अनेक वाहन चालक बेशिस्त वाहने लावत असल्याने ही वाहतूक कोंडी होत असून, कारवाई मोहीम तीव्र करण्याची मागणी होत आहे.