लोकमत न्यूज नेटवर्कगोंदी/वडीगोद्री : अंबड तालुक्यातील गोंदी मंडळात पावसाची चुकीची नोंदी घेणा-या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी मंडळ कृषी अधिका-यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन केले.कारवाईची मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिका-यांकडे केली होती. त्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी गोंदी येथे पावसाची नोंद घेणारे नवीन मशीन बसविले. दरम्यान आजवरची आकडेवारी चुकीची असल्याचे लेखी द्या, म्हणत मंडळ अधिकारी कृष्णा एडके यांच्या वाहनाला घेराव घातला. अखेर आ. राजेश टोपे यांच्या मध्यस्थीने शेतक-यांनी माघार घेतली.गोंदी मंडळात १ ते २७ जुलै दरम्यान केवळ २७ मिलीमीटर पाऊस झाला. मात्र, अधिका-यांनी अफलातून काम करत कागदावर ६८ मिलीमीटर पावसाची नोंद केल्याचे पहायला मिळत आहे. अधिका-यांनी गावात प्रत्यक्ष न येताच तहसील कार्यालयात बसूनच गोंदी मंडळात ६८ मिलीमीटर पाऊस पडल्याचा दाखविल्याने मंडळातील शेतक-यांनी जिल्हाधिका-यांना मंगळवारी निवेदन दिले होते.ग्रामस्थ, शेतक-यांनी निवेदन दिल्यानंतर निवासी जिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कृषी विभाग व अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने यांना ताबडतोब प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी शेतावर जाऊन पाहणी केला असता ६८ मिलीमीटर पाऊस पडला नसल्याचा अहवाल त्यांनी दिला.
अधिकाऱ्यांच्या वाहनाला नागरिकांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:45 IST