वालसावंगीत ग्रामपंचायत निवडणूक ठरणार चुरशीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:25 IST2021-01-02T04:25:52+5:302021-01-02T04:25:52+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगीची सर्वात मोठी सतरा सदस्यीय ग्रामपंचायत असून, सर्वच पॅनल प्रमुखांनी कंबर कसली आहे. मागील पंचवार्षिकला ...

वालसावंगीत ग्रामपंचायत निवडणूक ठरणार चुरशीची
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील वालसावंगीची सर्वात मोठी सतरा सदस्यीय ग्रामपंचायत असून, सर्वच पॅनल प्रमुखांनी कंबर कसली आहे. मागील पंचवार्षिकला चौपाल ग्रुपने सरपंच पद तब्बल पाच वर्ष ताब्यात ठेवले होते. आता मात्र निवडणूक प्रतिष्ठेची बनत आहे. गावातील भाजप व राष्ट्रवादी यांनी एकत्र लढवत युती केली आहे . तर दुसरीकडे चौपाल ग्रुप यांनीही शिवसेनेला सोबत घेतले आहे. नव्याने उभा राहिलेल्या यूथ ग्रुपने स्वतंत्र पॅनल उभे करून सर्वांसमोरच आव्हान उभे केले आहे. यात काही वॉर्डात अपक्ष उमेदवार उभे राहिले असल्याने निवडणुकीत रंगत आली आहे. सध्या गावात ७० पेक्षा अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
मागील निवडणुकीत गावातील चार पॅनलचे तब्बल सत्तरपेक्षा अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. यावेळेस युती केल्याने तीन पॅनल व काही ठिकाणी अपक्ष उमदेवार उभे आहेत. गावात एकूण सहा वॉर्ड असून, एकूण ८ हजार ५५७ मतदार आहेत. यात १ हजार ४०० पेक्षा अधिक प्रत्येकी वॉर्डमध्ये मतदार संख्या आहे. वॉर्ड क्रमांक १, ४ व ५ मध्ये तुल्यबळ उमेदवार असल्याने येथे मोठी टक्कर पहायला मिळणार आहे. गावातील दोन्ही पॅनल प्रमुखांनी आतापासूनच मतदारांना ठिकठिकाणी चहा, नाष्टा तर संध्याकाळी शेतात जेवणावळी सुरू केली आहे. यात सध्यातरी मतदारांची चंगळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.