चायनीज मांजाला पोलिसांची ढील; विक्रीमुळे वाढला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:42 IST2021-01-08T05:42:12+5:302021-01-08T05:42:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : शहरासह जिल्ह्यात मकर संक्रांतीनिमित्त पतंग व मांजाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जालना शहरातील ...

चायनीज मांजाला पोलिसांची ढील; विक्रीमुळे वाढला धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरासह जिल्ह्यात मकर संक्रांतीनिमित्त पतंग व मांजाची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जालना शहरातील बाजारपेठांमध्ये चायनीज मांजा विक्रीसाठी दाखल झाला असून, हा मांजा यावर्षीही पक्ष्यांच्या जीवावर बेतणार आहे. दरवर्षी या मांजामुळे अनेक पक्षी मरण पावतात तर काही व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. याकडे पोलीस प्रशासनही दुर्लक्ष करत आहे.
शासनाने चायनीज मांजावर बंदी घातलेली असली, तरी तो सर्रासपणे विकला जात आहे. हा मांजा स्वत:सह इतरांच्या जीवावर बेतणारा आहे. त्यामुळे प्रत्येकाला पतंग उडवताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, अनेकदा दुचाकीवरील व्यक्ती या मांजामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत अधिक गंभीरपणे विचार करण्याची गरज असल्याचे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे.
शासनाने बाजारात नायलाॅन आणि चानयीज मांजा विकण्यास बंदी घातली आहे. मात्र, असे असले तरी हा प्राणघातक मांजा बाजारात सहज उपलब्ध होत आहे. चायनीज मांजामुळे लहान मुलांचे हात कापणे, बोटांना इजा पोहोचणे, गंभीर जखमी होण्याच्या घटना घडत आहेत. पतंग उंचावर गेल्यावर हा मांजा पक्ष्यांना दिसत नाही. पक्ष्यांचा विहार सुरू असताना अचानक मांजा अडकतो, त्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी झाले आहेत तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. मात्र, असे असतानाही जालना शहरातील बहुतांश दुकानदार या मांजाची विक्री करत आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. गतवर्षी केवळ एका व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली तर दोन दिवसांपूर्वी चार दुकानदारांवर कारवाई करण्यात आली.
मांजामुळे पक्षी मृत्यूमुखी
सध्या मकर संक्रांतीनिमित्त पतंग व मांजाची खरेदी-विक्री सुरू आहे. चायनीज मांजामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी झाले आहेत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यात चिमण्या, बदक आदींचा समावेश आहे. वन विभागाने या मांजाबाबत जनजागृती केली पाहिजे. जेणेकरून लोक हा मांजा खरेदी करणार नाहीत.
कोट
चायनीज मांजावर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही आपल्याकडे या मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. यामुळे पक्ष्यांसह नागरिकांनाही जीव गमवावा लागतो. याबाबत जनजागृती करण्याची गरज असून, वन विभागाने यासाठी मोहीम राबविली पाहिजे. - ज्ञानेश्वर गिराम, पक्षीमित्र
शासनाने मांजावर बंदी घातलेली आहे. पोलीस प्रशासनाकडून या मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यावेळीही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्या अनुषंगाने सर्व पोलीस निरीक्षकांना आदेश देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वीच चारजणांवर कारवाई करण्यात आली. - विनायक देशमुख, पोलीस अधीक्षक
चायनीज मांजा विकणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाई
शासनाने चायनीज मांजावर बंदी घातलेली आहे. मात्र, असे असले तरी जालना जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात हा मांजा विकला जातो. मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाकडे देण्यात आली आहे. परंतु, पोलीस प्रशासन याकडे फारसे लक्ष देत नाही. गेल्यावर्षी पोलीस प्रशासनाने एका दुकानदारावर कारवाई केली होती तर नुकतीच चारजणांवर कारवाई केली.