' शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासातून' मुलांचे
कर्तृत्व हेरण्याचे कार्य- एस. पी. जवळकर
जालना : पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी आपल्या ‘शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासातून’ या पुस्तकात मुलांच्या मनातील शिंपले वेचून मुलांचे कर्तृत्व हेरण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन विचारवंत एस. पी. जवळकर यांनी येथे केले.
आनंद फाउंडेशनच्या वतीने आयोजित प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या हस्ते मंगळवारी लेखिका डॉ. प्रतिभा श्रीपत यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास डॉ. जगन्नाथ खंडागळे, डॉ. राजन उढाण यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जवळकर की, डॉ. प्रतिभा श्रीपत यांनी शिक्षकीपेशा सांभाळत लेखन केले आहे. त्यांच्या ‘शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासातून’ या पुस्तकात तर त्यांनी मुलांचे कर्तृत्व हेरण्याचे कार्य केले आहे. या पुस्तकात ऐका शिक्षिकेचे, एका भगिनीचे, एका आईचे मन आहे, डॉ. श्रीपत यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून श्रमाला बहर आणण्याचे कार्य केले आहे.
एका पिढीने दुसऱ्या पिढीला ज्ञान संक्रमित केले पाहिजे. आज शिक्षक व शेतकरी यांच्यावरच प्रकाशझोत टाकण्याची गरज आहे. हेच दोन घटक आज सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे ठरणारे असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. रामलाल अग्रवाल म्हणाले की, सर्वसामान्य माणसाला समोर ठेवूनच खरी साहित्य निर्मिती होत असते.
यावेळी डॉ. प्रतिभा श्रीपत, डॉ. खंडागळे आदींनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांनी डॉ. रामलाल अग्रवाल यांच्या कार्याचा गौरव करून शिक्षण विषयावर माफक लेखन होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के, डॉ. शिवराज लाखे यांचा गौरव करण्यात आला. प्रा. संदीप पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. ज्योती धर्माधिकारी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी आनंद फाउंडेशनचे डॉ. शिवाजी मदन, डॉ. नारायण बोराडे, ज्येष्ठ लेखिका रेखा बैजल, डॉ. संजीवनी तडेगावकर, स्मिता चेचानी, मसापचे अध्यक्ष प्रा. रमेश भुतेकर, पंडित तडेगावकर, डॉ. राजेंद्र उढाण, प्राचार्य डॉ. राजेंद्र गायकवाड, डॉ. शशिकांत पाटील, प्रा. रंगनाथ खेडेकर, प्रा. कार्तिक गावंडे, डॉ. प्रभाकर शेळके, डॉ. यशवंत सोनुने, कैलास शंकरपेल्ली यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, आनंद फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.