चांधई एक्कोत ड्रॅगन फ्रूट शेती बहरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:36 IST2021-09-07T04:36:26+5:302021-09-07T04:36:26+5:30
राजूर : पारंपरिक शेती व्यवसाय आतबट्ट्याचा व्यवसाय बनल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. त्यामुळे राजूर परिसरात मुबलक ...

चांधई एक्कोत ड्रॅगन फ्रूट शेती बहरली
राजूर : पारंपरिक शेती व्यवसाय आतबट्ट्याचा व्यवसाय बनल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. त्यामुळे राजूर परिसरात मुबलक पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन आधुनिक शेतीची कास धरल्याचे दिसून येत आहे.
चांदई एक्को येथील शेतकरी विष्णू लिंबाजी टोम्पे यांनी दोन एकर जमिनीत केळीसह ड्रॅगन फ्रूट नावाच्या विदेशी फळांची लागवड केलेली आहे.
राजूर परिसर हा जिरायत पट्ट्यात मोडणारा भाग आहे. परंतु, चांधई एक्को व बाणेगाव मध्यम प्रकल्पामुळे जलस्त्रोतात वाढ झाल्याने सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेती बागायती होण्यास मदत झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा पारंपरिक शेती व्यवसाय तोट्याचा झाल्याने शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. चांधई एक्को येथील तरुण शेतकरी विष्णू टोम्पे यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीसह केळीची लागवड केली आहे. झाडांना एक वर्ष पूर्ण झाले असून, झाडे फळांनी बहरली आहे. सदरील झाड हे वीस ते तीस वर्षापर्यंत चालते तसेच एका झाडाला ९०० रुपये इतका खर्च लागलेला आहे. झाड कमीत -कमी तीन हजार रुपये इतके उत्पन्न देते, असे टोम्पे यांनी सांगितले. सदरील विदेशी झाडांची लागवड परिसरात कुतूहलाचा विषय बनल्याने पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. आठ बाय दहा आकारात वृक्षाची लागवड केलेली असून, एकूण एक हजार झाडे लावण्यात आली आहेत. सदरील ड्रॅगन फ्रूट बाजारपेठेत विक्रीस आले असून, २०० रुपये प्रतिकिलो प्रमाणे विक्री होत असल्याचे टोम्पे म्हणाले. टोम्पे यांनी एका एकरात राईग्ज आणि शाईन नावाच्या केळीची सुद्धा लागवड केली असून, ५.५ च्या अंतरावर ही लागवड केलेली आहे. एक वर्षापूर्वी लागवड केलेली केळी आता काढायला आलेली असून, १००० रूपये दराप्रमाणे ५ लाख ४० हजार इतके उत्पन्न मिळण्याची अपेक्षा विष्णू टोम्पे यांनी व्यक्त केली आहे.
रानमेव्याची लागवड
नव्यानेच रानमेवा सुद्धा १० गुंठ्यात लागवड करण्यात आला असून, यामध्ये कंटूले लागवड केली आहे. या रानमेव्यास शहरात चांगला दर असून, २०० रुपये प्रति किलोप्रमाणे विक्री होत आहे. दीड महिन्यात ३० हजार रुपये इतके उत्पन्न मिळाल्याचे टोम्पे यांनी सांगितले. एकंदरीत सर्वच पिके ही या परिसरात प्रथमच पाहायला मिळत असल्याने शेतकरी पाहण्यासाठी येत आहे.