राज्यकर्त्यांना वाटते? -प्रा. लक्ष्मण ढोबळे
जालना : आपल्या नातवांचा सातबारा चालू राहण्यासाठी ओबीसींची जनगणना करणे अत्यंत धोक्याचे आहे, हे ज्यांना वाटते तेच ओबीसींच्या जनगणनेला विरोध करीत असल्याचे माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी आज येथे सांगितले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बहुजन रयत परिषदेच्यावतीने काढण्यात आलेल्या नवनिर्धार अभियानाचे जालना शहरात शुक्रवारी आगमन झाले. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. ढोबळे हे बोलत होते. यावेळी बहुजन रयत परिषदेचे प्रदेशाध्यक्ष रमेश गालफाडे, बहुजन रयत परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना प्रा. ढोबळे पुढे म्हणाले की, आज मराठा समाजाला आरक्षण लागू होणे गरजेचे आहे, ओबीसी आरक्षणाबाबत बोलतांना ते म्हणाले की, ज्या दिवशी ओबीसींच्या हाती राज्याचे नेतृत्व येईल तेव्हा खऱ्या अर्थाने दुबळ्या माणसाचे कल्याण होईल. ओबीसींची जनगणना व्हायलाच हवी, असेही ते म्हणाले. महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे महिला वर्ग भयभीत झाला आहे. महिला वर्गांना संरक्षण देण्याची जबाबदारी बहुजन रयत परिषदेची आहे. यासाठीच आपण साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवनिर्धार संवाद अभियान सुरू केले आहे. १८ जुलैपासून हे अभियान सुरू झाले आहे. या अभियानात झोपडपट्टी, मागास वस्तीत जाऊन आम्ही ५० जण दुबळ्या माणसांना व कमकुवत घटकांना त्यांच्या लाभाची ठिकाणे सांगत आहोत. आतापर्यंत २३ जिल्ह्यात हे अभियान पोहोचले आहे. नागरिकांना शिक्षण, आरोग्य व व्यवसाय ही त्रिसूत्री आम्ही सांगत आहोत. केंद्र सरकारच्या योजनांची माहितीही या अभियानात नागरिकांना दिली जात असल्याचे ते म्हणाले. या यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, ५ सप्टेंबर रोजी मुंबई येथील चिरागनगरात या अभियानाचा समारोप होणार असल्याचे ते म्हणाले.
विकासापासून दूर असलेल्या बहुजन समाजाला अ, ब, क, ड प्रवर्ग आरक्षण लागू करावे, वीर लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू करण्यात याव्यात, आदी मागण्या प्रा. ढोबळे यांनी यावेळी मांडल्या.