सावधान... १८ दिवसांत ७०० रुग्णांची भर : मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:57 IST2021-02-21T04:57:50+5:302021-02-21T04:57:50+5:30
जिल्ह्यात कोरोनावाढीमागे नेमके कुठले कारण आहे, हे समजू शकले नसले तरी नागरिकांची बेफिकिरीदेखील तेवढीच जबाबदार असल्याचे मानले जाते. मध्यंतरी ...

सावधान... १८ दिवसांत ७०० रुग्णांची भर : मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड
जिल्ह्यात कोरोनावाढीमागे नेमके कुठले कारण आहे, हे समजू शकले नसले तरी नागरिकांची बेफिकिरीदेखील तेवढीच जबाबदार असल्याचे मानले जाते. मध्यंतरी शासकीय पातळीवरही कोरोना हद्दपार झाल्यासारखेच वातावरण होते. कोरोना रुग्णांना चांगली सेवा आणि त्यांच्यावर इलाज करण्यासाठी कोविड केअर रुग्णालयांची उभारणी विक्रमी वेळेत जिल्हा प्रशासन आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकाराने झाली होती. त्यातच जिल्हा रुग्णालयाची मुख्य इमारतही गांधी चमन येथील महिला रुग्णालयात हलवून तेथेदेखील कोरोनाबाधितांवर उपाय केले जात होते. परंतु आता महिला रुग्णालयातील ओपीडी ही पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविली आहे. त्यातच नवीन रुग्ण वाढत असल्याने ही बाब तांत्रिकदृष्ट्या अति घाईत केल्याचे दिसून येत आहे.
एकूणच जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा परिषदेतील आरोग्य विभाग, सामान्य रुग्णालय आणि अन्य यंत्रणांना आता पुन्हा सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जालना शहरासह पालिकेतील यंत्रणांना आळस झटकून कामे करण्याचे सांगितले आहे.
मास्क नसल्यास ५०० रुपयांचा दंड
जालना पालिकेने आता कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे आज केवळ पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून, वेळ पडल्यास पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. मागील काळात शिक्षकांनाही रस्त्यावर उतरून नागरिकांवर नजर ठेवण्यासाठी नियुक्त केले होते. तशीच स्थिती निर्माण झाल्यास पुन्हा एकदा शिक्षकांना नियुक्त केले जाईल, असे सांगण्यत आले. मंगल कार्यालय, कोचिंग क्लास यांनाही सक्त ताकीद देण्यात आली असून, मंगल कार्यालयात समारंभासाठी केवळ ५० ते शंभर व्यक्तींचीच परवानगी देण्यात आली आहे.
चौकट
मास्क, सॅनिटायझरच्या मागणीत वाढ
कोरोनापासून बचावासाठी ढाल म्हणून मास्कचा वापर महत्त्वाचा आणि अनिवार्य केला आहे. मध्यंतरी हा मास्क वापरण्याकडे अनेकांनी दुर्लक्ष केले होते. अनेकांनी मास्क हे ठेवणीतील कपड्याप्रमाणे घरी सोडले हाेते. ते आता पुन्हा काढण्याची वेळ आली असून, सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क नसल्यास पालिकेकडून २०० रुपयांवरून दंडाची रक्कम वाढवून ती ५०० रुपये केली आहे. तसेच सुरक्षित अंतरासाठी व्यापारी, उद्योजकांना सूचना दिल्या आहेत. सॅनिटायझरचा वापर पुन्हा एकदा बंधनकारक केला आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायझरची मागणी नव्याने वाढली आहे.