समृध्दी महामार्गावर रानडुकराच्या धडकेनंतर कार जळून खाक
By दिपक ढोले | Updated: February 21, 2023 17:46 IST2023-02-21T17:46:05+5:302023-02-21T17:46:21+5:30
चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर कारला रानडुक्कर धडकले.

समृध्दी महामार्गावर रानडुकराच्या धडकेनंतर कार जळून खाक
जालना : भरधाव कारला रानडुकराने धडक दिल्यामुळे कॉम्प्रेसर फुटून कार जळाल्याची घटना नागपूर ते मुंबई या समृध्दी महामार्गावर सोमवारी मध्यरात्री घडली. यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. नचिकेत श्रीकांत पातूरकर (३०, रा. नागपूर) हे पत्नीसोबत कार क्रमांक (एमएच ४९ बीडब्ल्यू ५०९३) ने जात होते.
चंदनझिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्यावर कारला रानडुक्कर धडकले. त्यामुळे कारचे कॉम्प्रेसर फुटले. कारमधून धूर निघू लागल्याने नचिकेत पातूरकर व त्यांची पत्नी खाली उतरले. तेवढ्यात कारला आग लागली. याची माहिती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत साखरे, पोलिस नाईक कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी आग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.