उमेदवारांचे द्वंदयुद्ध एकेरीवर
By Admin | Updated: October 7, 2014 00:14 IST2014-10-07T00:02:38+5:302014-10-07T00:14:57+5:30
जालना : जिल्ह्यात शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ले चढवून वातावरण पेटवून दिले आहे.

उमेदवारांचे द्वंदयुद्ध एकेरीवर
जालना : जिल्ह्यात शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी एकमेकांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ले चढवून वातावरण पेटवून दिले आहे. त्यातच प्रमुख राजकीय नेत्यांच्या सभा जिल्ह्यात होत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात कमालीची शांतता जाणवत होती. विशेषत: युती आणि आघाडी होण्याबाबतची चर्चा ताणल्या गेल्याने व शेवटी युती आणि आघाडी संपुष्टात आल्याने चारही पक्षांचा उमेदवार शोधण्यात वेळ गेला. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत काही बंड केलेल्या तसेच अन्य काही उमेदवांराची मनधरणी करण्यात उमेदवारांचा वेळ गेला. परिणामी, प्रचारासाठी कमी वेळ मिळाला. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात हे वातावरण चांगलेच पेटले आहे. शहरी व ग्रामीण भागात सभा-संमेलनातून उमेदवार व पदाधिकारी परस्परांच्या कार्यपद्धतीवर हल्ले चढवित असून, त्याद्वारे मतदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज्यात शिवसेना, मनसेतर्फे भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतले जात आहे. तर भाजपाकडून शिवसेनेवर टीका न करता दोन्ही काँग्रेसवर टीका केली जात आहे. मात्र जालना जिल्ह्यात भाजपा, सेनेच्या उमेदवारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीवरच टीकेचे लक्ष्य ठेवले आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादीनेही भाजपा, सेनेवरच टीका सुरू केली आहे. मनसेकडून या चारही पक्षांवर टीका केली जात आहे. युती व आघाडी संपुष्टात आल्याने चारही पक्षांचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात स्वतंत्रपणे लढत असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच झडत आहेत. (प्रतिनिधी)
जालन्यात आ. कैलास गोरंट्याल व त्यांचे प्रतिस्पर्धी सेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी होत आहेत. शहराच्या जायकवाडी पाणीपुरवठा योजनेवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अरविंद चव्हाण हे या मतदारसंघातून प्रथमच तेही भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवित असल्याने केंद्रात मोदींना साथ देण्यासाठी राज्यात भाजपाचे सरकार आणावे व त्यासाठी आपणास निवडून द्यावे, असे आवाहन करीत आहेत.
घनसावंगीमध्ये राष्ट्रवादीचे राजेश टोपे व त्यांचे पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपाकडून उभे असलेले विलास खरात यांच्यातही फैरी रंगत आहेत. तर सेनेचे हिकमत उढाण व मनसेचे सुनील आर्दड यांच्याकडून टोपेंना टीकेचे लक्ष्य करण्यात आले आहे. भोकरदनमध्ये राष्ट्रवादीचे आ. चंद्रकांत दानवे व भाजपाचे संतोष दानवे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत दानवे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तर सेनेचे रमेश गव्हाड, काँग्रेसचे सुरेश गवळी, अपक्ष एल.के. दळवी हेही प्रतिस्पर्ध्यांवर टीका करीत आहेत.
४बदनापूरमध्ये शिवसेनेचे आ. संतोष सांबरे व राष्ट्रवादीचे बबलू चौधरी यांच्यात कार्यपद्धतीवरून तसेच पक्षाच्या ध्येय, धोरणावरून टीका होत आहे. भाजपाचे नारायण कुचे व मनसेचे ज्ञानेश्वर गायकवाड हे नव्यानेच या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. गायकवाड यांनी टीकेचे लक्ष्य शिवसेनेवर ठेवले आहे. परतूरमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आ. सुरेश जेथलिया व भाजपाचे बबनराव लोणीकर यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. सेनेचे साखरे आणि राष्ट्रवादीचे सरकटे हेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका करीत आहेत.