कारवाईचा इशारा देताच स्थानकात बसचा प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:38 IST2021-02-25T04:38:19+5:302021-02-25T04:38:19+5:30
शहागड : येथील बसस्थानकात बस न येता बाहेरूनच निघून जात असल्याचा प्रकार बुधवारी अंबडचे वाहतूक नियंत्रक नासेर खान यांच्यासमोर ...

कारवाईचा इशारा देताच स्थानकात बसचा प्रवेश
शहागड : येथील बसस्थानकात बस न येता बाहेरूनच निघून जात असल्याचा प्रकार बुधवारी अंबडचे वाहतूक नियंत्रक नासेर खान यांच्यासमोर घडला. प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता खान यांनी चक्क रस्त्यावर उभे राहून बस चालक- वाहकाला कारवाईची तंबी दिली. कारवाईची तंबी दिल्याने अनेक चालकांनी शहागड बसस्थानकात बस नेली.
अंबड तालुक्यातील शहागड येथील बसस्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या बसेस येत नसल्याच्या तक्रारी आहेत. बाहेर रस्त्यावर बस उभी राहत असल्याने महिला, वृध्द प्रवाशांना साहित्य घेऊन शंभर मीटर अंतरापर्यंत धावपळ करावी लागते.
याबाबत राज्य परिवहन महामंडळाच्या जालना विभाग नियंत्रक, अंबड आगार प्रमुख यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु, तरीही बसस्थानकात बस नेण्यास चालक तयार नव्हते. काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून बसस्थानकाबाहेर बस उभी करणाऱ्या चालकांचा सत्कार करून गांधीगिरी केली होती. त्यात बुधवारी सकाळी शहागड येथे वाहतूक नियंत्रक नासेर खान आले असता अनेक चालक वाहतूक नियंत्रण कक्षात नोंद न करता, बाहेरच्या बाहेर जात असल्याचे व बसस्थानकात बसलेले प्रवासी बसच्या मागे धावत असल्याचे त्यांना दिसून आले. खान यांनी बसस्थानकाबाहेर उभे राहून बाहेरून जाणाऱ्या चालकांना धारेवर धरत बस बसस्थानकात घेण्यास भाग पाडले. बस बसस्थानकात आल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय थांबली.
कारवाईचा इशारा
जे बसचालक शहागड बसस्थानकात बस न नेता बाहेरून प्रवासी ने- आण करीत असतील अशा चालकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या जाणार आहेत. त्यामुळे चालकांनी नियमानुसार बस बसस्थानकात नेऊन प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी, नियमित नोंदणी करावी, असे आवाहनही खान यांनी केले आहे.