गायब झालेल्या मुलाचा शेततळ्यात आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST2020-12-23T04:27:34+5:302020-12-23T04:27:34+5:30
फोटो जालना : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी ...

गायब झालेल्या मुलाचा शेततळ्यात आढळला मृतदेह
फोटो
जालना : रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या एका १७ वर्षीय मुलाचा शेततळ्यात मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी रात्री समोर आली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडचणी येत असल्याने शेततळे फोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
अनिरुद्ध दामोदर उगले (१७) असे मयत मुलाचे नाव आहे. किरकोळ कारणावरून पालक रागावल्याने अनिरुद्ध उगले हा शनिवारी सायंकाळी रागाच्या भरात घरातून निघून गेला होता. तो रात्री घरी न आल्याने नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला; परंतु तो आढळून आला नाही. सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या चपला त्याच्या काकाच्या शेतातील शेततळ्याजवळ दिसून आल्या. त्यामुळे नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी शोधकार्य सुरू केले. रात्रीची वेळ असल्यामुळे मृतदेहाचा शोध घेताना अनेक अडचणी येत होत्या. त्यावेळी ग्रामस्थांनी बाजूने शेततळे फोडून पाणी बाहेर काढले. त्यावेळी त्या युवकाचा मृतदेह मिळून आला. यावेळी त्याच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला होता. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात वडील, आई, भाऊ, बहीण, दोन चुलते, काकी असा मोठा परिवार आहे.