भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:56 IST2021-02-18T04:56:45+5:302021-02-18T04:56:45+5:30
पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष ...

भाजपचा महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा
पारध : वीजबिल वसुलीसाठी कृषीपंपांचा वीजुरवठा खंडित करण्यात येत आहे. विजेअभावी पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांसमवेत काढण्यात आलेल्या या मोर्चानंतर या भागातील ११ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
गतवर्षी अतिवृष्टीमुळे खरिपातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली. शासनाच्या नुकसान अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहिले. अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने यंदा रब्बीचाही पेरा वाढला होता. शेतकऱ्यांनी रोगराईसह इतर नैसर्गिक आपत्तीवर मात करून रब्बीतील पिके जगविली आहेत. परंतु, पिंपळगाव रेणुकाई येथील वीज उपकेंद्रातून थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी तीन हजार कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. परिणामी विजेअभावी पाणी देता येत नसल्याने हातातोंडाशी आलेले रब्बी हंगामातील पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी सकाळी भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव रेणुकाई येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रश्नांचा भडीमार करीत वीजपूर्वठा पूर्ववत करण्याची मागणी केली. आंदेालकांची आक्रमकता पाहता सहायक अभियंत्ता एस. यू. खोब्रागडे यांनी वीजपुरवठा पूर्ववत केला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष देशमुख,पंचायत समिती सदस्य गणेश लोंखडे,सुखलाल बोडके, सांडू वाघ, संजय चंदनसे, रमेश मिसाळ, शिवा लोंखडे, देवेंद्र लोंखडे, अमोल देशमुख, हरिभाऊ आहेर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याने पारध पोलीस ठाण्याचे पोनि. रमेश जायभाय यांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी पोलीस कर्मचारी सुरेश पडोळ, विकास जाधव, किशोर मोरे, लक्ष्मण रानगोते, नितेश खरात आदींनी बंदोबस्ताचे काम पाहिले.
शेतकऱ्यांना दिलासा
या आंदोलनानंतर ११ गावातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळगाव रेणुकाई, पारध बु., पारध खुर्द, पद्मावती, वरुड बु, रेलगाव, मोहळाई, माळेगाव, कोसगाव अवघडराव सांवगी आदी गावातील ३५० विद्युत रोहित्रावरील तीन हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रब्बीतील पिके हाती पडण्याची आशा निर्माण झाली आहे.
फोटो