भाजपचा वारू रोखण्याचे आघाडीसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST2021-04-06T04:29:00+5:302021-04-06T04:29:00+5:30
जालना : शिवसेनेचे बोट पकडून महाराष्ट्रात रूजलेल्या भाजपला सध्या खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत. जालना लोकसभा मतदार संघात केंद्रीय ...

भाजपचा वारू रोखण्याचे आघाडीसमोर आव्हान
जालना : शिवसेनेचे बोट पकडून महाराष्ट्रात रूजलेल्या भाजपला सध्या खरोखरच ‘अच्छे दिन’ आले आहेत. जालना लोकसभा मतदार संघात केंद्रीय मंत्री हे १९९९पासून निवडून येत आहेत तर आज बदनापूर, परतूर तसेच भोकरदन येथे तीन आमदारही भाजपचेच आहेत. जालना जिल्हा परिषदेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र नसते तर तेथेही भाजपचेच सदस्य जास्त निवडून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भाजप रूजले असून, त्यांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान उभे केले असून, आगामी काळात भाजपचा वारू रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. भाजपने खऱ्या अर्थाने आपली पाळमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक तसेच जनसंघाच्या माध्यमातून रूजवली. जनता पार्टीच्या तिकिटावर माजी खासदार पुंडलिक हरिदानवे हे १९७७मध्ये आणि नंतर भाजपच्या तिकिटावर १९८९मध्ये निवडून आले होते. त्यानंतर पुन्हा एकदा १९९६ आणि १९९८मध्ये उत्तमसिंग पवार हे विजयी झाले होते. नंतर २००४मध्ये उत्तमसिंग पवार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून रावसाहेब दानवेंना आव्हान दिले होते. परंतु, ते तेथे पराभूत झाले होते.
आज परतूर येथे आमदार बबनराव लोणीकर, बदनापूरला आमदार नारायण कुचे तर भोकरदन येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडे खासदारकीसह तीन आमदार आहेत. आता जालना पालिकेच्या आगामी निवडणुकांकडे भाजपचा डोळा असून, त्यादृष्टीने त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. परंतु, जालना पालिकेत आमदार कैलास गोरंट्याल यांचे गेल्या दहा वर्षांपासून चर्वस्व आहे. त्या वर्चस्वाला धक्का लावताना भाजपची मोठी दमछाक होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीच लक्ष घातले असून, शिवसेना आणि काँग्रेसमधील बेबनाव हा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र, असे असले तरी भाजपमधील खासदार दानवे आणि आमदार बबनराव लोणीकरांच्या गटबाजीमुळे येथे शह बसू शकतो, असेही सांगितले जाते. आज भाजपची शिवसेनेसोबत जालना बाजार समितीत युती असून, भास्कर दानवे हे उपसभापती आहेत. तसेच जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेत स्वत: रावसाहेब दानवे हे संचालक आहेत. त्यामुळे भाजपने आपली पाळेमुळे घट्ट केली असून, त्यांना धक्का देताना खरी कसोटी आता महाविकास आघाडीची राहणार आहे.
चौकट
आम्ही शर्थीचे प्रयत्न करणार
जालना पालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपला सर्व जागांवर उमेदवार देण्याची संधी यावेळी आहे. शिवसेना व भाजप युती नसल्याने हे शक्य होणार आहे. आज पालिकेतील सत्ताधारी प्रबळ आहेत. त्यांना धक्का देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनानुसार व्यूहरचना आखणे सुरू आहे. त्यामुळे पालिकेत भाजपचेच बहुमत कसे येईल, यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत.
- अशोक पारंगारकर, गटनेते, भाजप, जालना पालिका.