सावधान... जालन्यात डेंग्यू, चिकनगुनिया पसरतोय पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:36 IST2021-09-17T04:36:12+5:302021-09-17T04:36:12+5:30
मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत होणारे बदल आणि पडणारा पाऊस यामुळे विविध साथरोग फैलावत आहेत. शिवाय पावसाळ्यात कोरडा दिवस ...

सावधान... जालन्यात डेंग्यू, चिकनगुनिया पसरतोय पाय
मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत होणारे बदल आणि पडणारा पाऊस यामुळे विविध साथरोग फैलावत आहेत. शिवाय पावसाळ्यात कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करूनही अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत आहेत. डेंग्यूचा फैलाव करणारे डास स्वच्छ पाण्यात पैदास होतात. कोरडा दिवस न पाळणे, घरासह परिसरात अस्वच्छता, ठिकठिकाणी पाण्याचा साठा होणे यामुळे डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांचा उद्रेक वाढला आहे. परिणामी जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. त्यात चिकुनगुनिया, काविळ या आजारानेही डोके वर काढले असून, असंख्य रुग्ण या आजाराच्या विळख्यात आले आहेत. या आजाराची लागण होवू नये यासाठी प्रशासकीय सूचनांचे पालन करून स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
रोज किमान दहा पेशंट
जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या डेंग्यू, चिकुनगुनियाने त्रस्त असलेले सरासरी दहा रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्याशिवाय इतर साथरोगाचे रुग्णही वाढले आहेत. यासह खासगी रुग्णालयातील रुग्णांची संख्याही वाढल्याचे दिसत आहे.
बालकांचे प्रमाण जास्त
जालना शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या विविध भागात डेंग्यू, चिकुनगुनिया, काविळ आदी विविध आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत.
या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मुलांना आजार होवू नये यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
काय आहेत लक्षणे?
डेग्यू : डेंग्यू आजारात अचानक ताप येणे, डोके, अंग, सांधे दुखणे, डोळ्यांच्या मागे दुखण्याचा त्रास होतो. शिवाय त्वचेवर पुरळ उठतात. नाकातून, हिरड्यातून रक्तप्रवाह होवू शकतो. चिकुनगुनिया : अधिक ताप येणे, चेहऱ्यावर पुरळ उठणे, सांधे मोठ्या प्रमाणात दुखणे, हलचाल करताना अधिकचा त्रास होणे, डोके अधिक प्रमाणात दुखणे ही चिकुनगुनियाची लक्षणे आहेत.
काविळ : काविळ आजाराचेही रुग्ण शहरासह ग्रामीण भागात आढळून येत आहेत. काविळ आजार झाल्यानंतर त्वचा, डोळे पिवळे होतात. लघुशंकेचा रंग अधिक पिवळ होतो. सतत उलट्या होणे, खाज येणे, झोपमोड होणे, पोटदुखीसह इतर शारीरिक त्रास काविळ झाल्यानंतर होतात. ही लक्षणे असतील तर वेळेवर उपचार घ्यावेत.
दक्षता गरजेची...
डेंग्यूसदृश, चिकुनगुनिया व इतर आजाराचे रूग्ण आढळून येत आहेत. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याही काही प्रमाणात वाढली आहे. या आजारापासून बचाव करण्यासाठी डासांचा प्रादुर्भाव वाढू नये याची काळजी घ्यावी. शिवाय स्वच्छतेवर अधिकचा भर द्यावा.
- डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक