शेळकेंचा खून करण्यासाठी अडीच लाख रूपयांची सुपारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:28 IST2021-02-20T05:28:03+5:302021-02-20T05:28:03+5:30
जालना : पाहेगाव येथील रमेश शेळके यांचा खून करून फरार असलेल्या सिंदखेडराजा येथील दोन आरोपींना सेवली पोलिसांनी जेरबंद ...

शेळकेंचा खून करण्यासाठी अडीच लाख रूपयांची सुपारी
जालना : पाहेगाव येथील रमेश शेळके यांचा खून करून फरार असलेल्या सिंदखेडराजा येथील दोन आरोपींना सेवली पोलिसांनी जेरबंद केले आहे. शेळके यांचा खून हा मेहकर जवळील अंजनी फाट्याजवळ करण्यात आला होता. त्यानंतर नागापूर शिवारात त्यांची गाडी मृतदेहासह जाळून दरीत ढकलण्यात आली होती. यासाठी आम्ही अडीच लाख रूपयांची सुपारी घेतली असल्याची कबुली सिंदखेडराजा येथील आरोपींनी दिली आहे, अशी माहिती सेवली पोलिसांनी दिली.
पाहेगाव येथील रमेश शेळके (५५) यांचा खून करून कारसह मृतदेह जाळून दरीत ढकलल्याची घटना जालना तालुक्यातील सेवली-पाहेगाव रस्त्यावरील नागापूर शिवारात ८ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी मयताचा मुलगा अक्षय रमेश शेळके यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रामप्रसाद नामदेव शेळके, एक महिला व सचिन रामप्रसाद शेळके, संदीप रामप्रसाद शेळके, विशाल काळे (रा. बाबुलतारा) व अर्जुन दंडाईत (रा. ब्राम्हणखेडा) यांच्याविरुध्द सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तिघांसह पोलिसांनी मुख्य आरोपी अर्जुन दांडाईत याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, तो म्हणाला की, शेळके यांच्याकडे ३० लाख रूपये होते. ते पैसे देत नसल्यामुळेच सिंदखेडराजा येथील साथीदारांच्या मदतीने त्यांचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर सेवली पोलिसांनी सिंदखेडराजा येथील कृष्णा यादवराव चौधरी, आकाश रमेश कुहीरे यांना औरंगाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता, त्यांनी शेळके यांचा खून करण्यासाठी अडीच लाखांची सुपारी घेतली असून, शेळके यांचा खून मेहकर जवळील अंजनी फाट्याजवळ केला असल्याचे सांगितले. दरम्यान, अटक असलेल्या सर्व आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मोरे यांनी दिली.
ते दोघे अटक झाल्यानंतरच होईल स्पष्ट
शेळके यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून मयताचा भाऊ रामप्रसाद नामदेव शेळके, एक महिला व सचिन रामप्रसाद शेळके, संदीप रामप्रसाद शेळके, विशाल काळे (रा. बाबुलतारा) व अर्जुन दांडाईत यांच्याविरुध्द सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील रामप्रसाद शेळके, संदीप शेळके, अर्जुन दांडाईत व एक महिला यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. यातील सचिन शेळके व विशाल काळे हे फरार असून, त्यांच्या मागावर पोलीस आहे. शेळके यांच्या खुनात त्यांच्या भावाचा काही संबंध आहे का ? याचे उत्तर त्या दोघांना अटक केल्यानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.