गोसावी येथे वृक्षारोपण
मंठा : तालुक्यातील पांगरी गोसावी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धस यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आळे. यावेळी सरपंच परमेश्वर मानकर, उपसरपंच संतोष पवार, ग्रामसेवक सरोदे, सदस्य अनंता चव्हाण, भगवान जाधव हे उपस्थित होते.
अंकुश चव्हाण यांची उपाध्यक्षपदी निवड
अंबड : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या चित्रपट, कला साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या जालना जिल्हा उपाध्यक्षपदी तीर्थपुरी येथील मत्स्योदरी कला महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डाॅ. अंकुश चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. विनोद जाधव यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी श्रीराम जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या निवडीचे स्वागत होत आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासणी
जालना : अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रूक येथील आरोग्य उपकेंद्राकडून कीटकशास्त्रीय सर्वेक्षण अंतर्गत सोमवारी गावातील घराघरातील पाणीसाठ्याची तपासणी करण्यात आली. यासाठी आरोग्य अधिकारी डाॅ. राजेंद्र गायके, आरोग्य सहायक अब्दुल सिद्दीकी, आरोग्य सेवक संजय जाधव, परिचारिका नीता खेडकर, आशा सेविका रूक्मिणी टोपे, द्रौपदी कारके, खरात आदींनी परिश्रम घेतले.
वीजपुरवठा खंडित, ग्राहकांची गैरसोय
जालना : शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. अचानक वीज गुल होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. शिवाय पावसाने ओढ दिल्यामुळे पिके जगविण्यासाठी धडपड करीत असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.
आमदारांच्या निलंबनाचा निषेध
बदनापूर : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्यासह भाजपच्या १२ आमदारांचे सोमवारी एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले. या निलंबनाचा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी अनिल कोलते, देविदास कुचे, भगवान मात्रे, हरिश्चंद्र शिंदे, गणेश कोल्हे, विलास जऱ्हाड, गोरखनाथ खैरे हे हजर होते.
राजेवाडी येथे एकास विळ्याने मारहाण
बदनापूर : तालुक्यातील राजेवाडी शिवारात शेतात नांगरणी करत असताना तिघांनी आमच्या शेतात का नांगरतोस असे म्हणत एकास हातावर लोखंडी विळ्याने मारहाण करीत जखमी केले. याप्रकरणी सोमवारी तिघांविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप गुसिंगे, संदीप गुसिंगे व एक महिला (सर्व रा. राजेवाडी) अशी संशयितांची नावे आहेत.
आरोग्य वर्धिनी केंद्राला मशीन भेट
जालना : इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज व एक्सागो यांच्या वतीने वाटूर आरोग्य वर्धिनी केंद्राला दोन ऑक्सिजन मशीनचे वितरण करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी जावेद सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन वायाळ, डॉ. अमोल भताने, सरपंच कमल केसरखाने, बद्रीनारायण खवणे, विक्रम नाना माने, प्रा. पुरुषोत्तम वायाळ आदींची उपस्थिती होती.