महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:28 IST2021-02-12T04:28:25+5:302021-02-12T04:28:25+5:30
फोटो वाढलेले खड्डे व धुळीमुळे वाहनधारक त्रस्त परतूर : शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले ...

महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
फोटो
वाढलेले खड्डे व धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
परतूर : शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यातच धुळीचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
शहरात उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे महाविद्यालय रस्त्याने वाहतूक वळविण्यात आली होती. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होती. या रस्त्यावरून जड वाहने गेल्याने रस्ता पूर्णपणे फुटला आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दोनवेळा खड्डे बुजविण्यात आले; परंतु दहा ते बारा दिवसांत पुन्हा रस्त्याची अवस्था जैस थे झाली. सध्या रस्त्यावरील खडी उखडून पडलेली आहे. यामुळे धुळीचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्याच्या दुतर्फा घरे असल्याने रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्रास
या रस्त्यावर महाविद्यालय व शाळा आहेत. त्यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. आता या विद्यार्थ्यांनाही धुळीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरील पूलही धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. यामुळे बराचवेळ वाहतूक ठप्प होते. या रस्त्याचे व पुलाचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
या रस्त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी जास्तीचा निधी लागणार आहे. मंजुरी मिळताच रस्त्याचे काम हाती घेण्यात येईल.
सुधीर गवळी, मुख्याधिकारी, न. प.
फोटो
परतूर शहरातील महाविद्यालय रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. यामुळे रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे.