बाळ आयसीयूत, मी बाहेर... बाळासाठी मातांची घालमेल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:22+5:302021-01-15T04:25:22+5:30
जालना : भंडारा रुग्णालयातील अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील महिला रुग्णालयातील नवजात शिशू दक्षता कक्षात बालके असलेल्या मातांच्याही जिवाची घालमेल ...

बाळ आयसीयूत, मी बाहेर... बाळासाठी मातांची घालमेल...
जालना : भंडारा रुग्णालयातील अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर जालना येथील महिला रुग्णालयातील नवजात शिशू दक्षता कक्षात बालके असलेल्या मातांच्याही जिवाची घालमेल सुरू असल्याचे बुधवारी महिलांशी संवाद साधल्यानंतर दिसून आले. मात्र, या कक्षातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची दक्षता आणि उपलब्ध सुविधांमुळे या मातांना मोठा दिलासा मिळत आहे.
जालना शहरातील १०० खाटांच्या महिला रुग्णालयात दैनंदिन सरासरी २० ते २२ महिलांच्या प्रसूती होतात. ज्या नवजात बालकाचे वजन कमी आहे किंवा ज्यांना श्वास घेण्यास काही त्रास होत असेल अशा बालकांना ३७ बेड क्षमता असलेल्या नवजात शिशू दक्षता कक्षात ठेवले जाते. या कक्षात एक वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, इतर कर्मचाऱ्यांसह सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, स्मोक डिटेक्टर यंत्रणा, अग्निशमन यंत्रणेची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
जालना येथील नवजात शिशू दक्षता कक्षात बुधवारी १७ बालकांना ठेवण्यात आले आहे. यात महिला रुग्णालयात प्रसूती झालेल्या मातांसह खाजगी रुग्णालयातील कमी वजनाच्या बालकांसह इतर आजार असलेल्या बालकांचा समावेश आहे. या कक्षाच्या बाहेरच संबंधित बालकांच्या मातांसह नातेवाईक बसल्याचे दिसून आले. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर येथील मातांसह नातेवाइकांच्या चेहऱ्यावर बालकांची काळजी अधिक दिसून आली. मात्र, रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी घेत असलेल्या दक्षतेबाबतही मातांसह नातेवाइकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
आमच्या बाळाला बदनापूर येथून औरंगाबादला रेफर केले होते; परंतु आम्ही जालना येथे आलो आहोत. बाळ आतमध्ये असते, तर आम्ही बाहेर असतो. त्यामुळे त्याची काळजी वाटते; परंतु येथील स्टाफ सहकार्य करीत असल्याचे कविता गुडेकर म्हणाल्या.
गत पाच दिवसांपासून आमचे बाळ एसएनसीयू कक्षात आहे. भंडारा येथील घटनेमुळे काळजी अधिकच वाढली आहे; परंतु येथील स्टाफ बाळाच्या तब्येतीची आम्हाला वेळोवेळी माहिती देत असल्याचे मनीषा शिकारे म्हणाल्या.
भंडारा येथील घटना खूपच वेदनादायक आहे. कावीळ झाल्याने आमचे बाळ येथे ठेवले आहे. येथील डॉक्टर, कर्मचारी आमच्या बाळाच्या तब्येतीची वेळोवेळी माहिती देतात. दक्षता घेऊन आम्हीही आतमध्ये जाऊ शकत असल्याचे स्वराली हवानी म्हणाल्या.
महिला रुग्णालयातील एसएनसीयू कक्षात ठेवण्यात येणाऱ्या बालकांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली जाते. येथे दक्षतेच्या सर्व सुविधा असून, मातांसह नातेवाइकांनाही आम्ही सर्व ते सहकार्य करतो.
- डॉ. केतन चव्हाण, एसएनसीयू विभागप्रमुख