आरोग्यदायी जीवनासाठी सजगता बाळगावी : टोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST2021-01-14T04:26:04+5:302021-01-14T04:26:04+5:30
अंबड : आरोग्यदायी जीवनासाठी प्रत्येकाने सजगता बाळगावी, स्वत:ची व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेऊन आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच ...

आरोग्यदायी जीवनासाठी सजगता बाळगावी : टोपे
अंबड : आरोग्यदायी जीवनासाठी प्रत्येकाने सजगता बाळगावी, स्वत:ची व कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काळजी घेऊन आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करून घ्यावेत, असे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.
शहरातील पं. गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात टोपे यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त यशस्वी ॲकॅडमी फॉर स्किल संस्थेच्या महाराष्ट्र कौशल विकास केंद्र व एम. आय. टी. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मोफत किडनी तपासणी व आरोग्य मार्गदर्शन’ कार्यक्रमात टोपे बोलत होते. या एकदिवसीय शिबिराचा ८७ किडनी आजारग्रस्त रुग्णांनी लाभ घेतला. जिल्ह्यातील आसपासच्या भागातील किडनी आजाराच्या रुग्णांना आवश्यक असलेली डायलेसिस उपचार सुविधा एम. आय. टी. रुग्णालयाच्या तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शहरातील महाराष्ट्र कौशल विकास केंद्रात लवकरच कार्यान्वित करण्यात येईल, अशी घोषणा यावेळी टोपे यांनी केली. कोरोना संकटाशी ज्या धैर्यशक्तीने आपण सगळेजण लढत आहोत, त्याच पद्धतीने सर्वांनी लसीकरण मोहिमेतदेखील आरोग्य विभाग व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, टोपे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुहास बावीकर, अमोल टोपे, जगन्नाथ हल्ल्याळ, डॉ. निसार देशमुख, डॉ. भागवत कटारे यांची उपस्थिती होती. अशोक काळे यांनी सूत्रसंचालन केले. विश्वंभर महाकाळकर यांनी आभार मानले.