जालना येथील शेर सवार दर्गाचा यंदा ७४३ वा उरूस भरणार आहे. त्या निमित्त सैय्यद नुरी हे जालन्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माहिती देतांना ते म्हणाले की, अनेक ठिकाणी प्रेतिषांचे काल्पनिक रेखाचित्र तयार केली जात आहेत, तर कुठे अहले बैत आणि सहाबा यांचा अपमान केला जात आहे. तर काही ठिकाणी सुफी संतांच्या बाबतीत अपशब्द काढले जात आहेत. यामुळे इस्लामी जगात व्यापक अशांतता पसरली आहे. दिवसेंदिवस मुस्लिमांना अशा प्रकारच्या समस्यांचा सामोरे जावे लागत आहे. या अपमानांमुळे व्यथित झालेले मुस्लीम युवक रस्त्यावर उतरतात. यामुळे त्यांनाच यातना भोगाव्या लागतात. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन, राष्ट्र पातळीवर अशा संघटनेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जी संघटना पैगंबरांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी कायद्याचा उपयोग करून सदैव कार्यरत राहील.
यालाच ‘प्रेषित सन्मान संरक्षण’ चळवळ म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे नुरी म्हणाले. यासाठी कायदेशीर दृष्टिकोनातून असे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही वकिलांचा बोर्डही तयार करत आहोत. जेणेकरून पवित्र आणि आदरणीय व्यक्तिमत्त्वांच्या अपमानाविरूद्ध लोकशाही पद्धतीने कायदेशीर कारवाई करता येईल. म्हणून, पैगंबरांच्या सन्मानाचे संरक्षण एक मिशन म्हणून सर्वत्र पसरविले जाईल असे त्यांनी सांगितले. नुरी हे रजा अकादमीचे संस्थापक आणि सरचिटणीस आहेत.
या पत्रकार परिषदेस मुंबईचे मौलाना जहीर अब्बास रज्वी, मौलाना जफरउद्दीन रज्वी, नूरी मियां, मौलाना अहमद रजा कुवारी, हजरत सैय्यद अहमद शेर सवार दर्गाचे प्रमुख सैय्यद जमील रज्वी, रजा अॅकॅडमी धुळ्याचे जिल्हाध्यक्ष सैय्यद अली अंजुम रज्वी, मेमन आसिफ रज्वी आदी उपस्थित होते.
मुहम्मद सईद नुरी आणि इतर सुन्नी धर्मगुरूंनी यापूर्वी ‘प्रेषित सन्मान संरक्षण’ या चळवळीच्या माध्यमातून मराठवाड्यातील अनेक शहरांचा दौरा केला. पुढे ते विदर्भ आणि खान्देशाचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.