भोकरदन तालुक्यात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:08+5:302021-02-26T04:44:08+5:30
भोकरदन - भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अदयाप एकाही चोरट्याला पकडले नाही. ...

भोकरदन तालुक्यात जनावरे चोरट्यांचा धुमाकूळ
भोकरदन - भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी अदयाप एकाही चोरट्याला पकडले नाही. त्यातच बुधवारी मध्यरात्री भोकरदन, नांजा व बोरगाव जहांगीर येथील सात जनावरे चोरी गेली आहेत. चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. नांजा येथील समाधान विठ्ठल मोरे यांनी बुधवारी सायंकाळी दोन बैल व एक गाय गोठ्यात बांधली होती. त्यानंतर ते घरी गेले. गुरुवारी सकाळी शेतात आले असता, त्यांना जनावरे दिसली नाहीत. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे भोकरदन ते मासनपूर रस्त्यावरील गोविंद गणपत जाधव यांचे दोन बैल चोरट्यांनी गाडी टाकून नेले. या गाडीचा पाठलाग करेपर्यंत चोरट्यांनी गाडी पळवून नेली. त्यानंतर बोरगाव जहागीर येथील भगवान कुदर यांचा ५० हजार रुपये किमतीचा एक बैल चोरीस गेला आहे. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोकरदन तालुक्यात मागील काही दिवसांपासून जनावरे चोरीच्या घटना घडत आहेत. असे असतानाही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. आतापर्यंत एकाही चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. पोलीस प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांनी उपोषणदेखील केले होते. परंतु, त्याचा काही फायदा झाला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
भोकरदन तालुक्यात जनावरे चोरी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. भोकरदन, बाभुळगाव, डावरगाव, दानापूर, दगडवाडी या गावांतून आतापर्यंत जवळपास ५० जनावरे चोरीला गेली आहेत. पोलिसांना एकाही गुन्ह्याचा तपास लावता आला नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
आशा पांडे, जि. प. सदस्या