ऑनलाईन लुटीच्या पैशांतून आयफोन मागवला अन् अडकले; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
By दिपक ढोले | Updated: July 29, 2023 15:36 IST2023-07-29T15:35:47+5:302023-07-29T15:36:17+5:30
बँकेची डिटेल्स घेत महिलेने एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केली.

ऑनलाईन लुटीच्या पैशांतून आयफोन मागवला अन् अडकले; पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात
जालना : मी ॲक्सिस बॅंकेमधून बोलतेय, असे सांगून बँकेची डिटेल्स घेत महिलेने एकाची दीड लाख रुपयांची फसवणूक केली. याच लुटीच्या पैशांतून फ्लिपकार्डद्वारे आयफोन मागितला अन् सायबर पोलिसांनी एका इसमासह तिला शुक्रवारी जेरबंद केले. करिश्मा देवराव सोनवणे (२८, रा. पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर), अमोल कडूबापू वारकर (२३, रा. खोपडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ लाख ९१ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना शहरातील राम पारवे यांना १८ जुलै रोजी एका महिलेने फोन केला होता. मी ॲक्सिस बॅंकेमधून करिष्मा बोलते, असे सांगून त्यांच्याकडून क्रेडिट कार्ड, बँक डिटेल्स आणि ओटीपी आदी माहिती विचारून घेतली. नंतर त्यांच्या खात्यातून जवळपास १ लाख ५६ हजार १०८ रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, याची माहिती सायबर पोलिसांना देण्यात आली. सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्याचवेळी आरोपीने सदरील रक्कम फ्लिपकार्डद्वारे आयफोन खरेदीसाठी वापरली असल्याचे निष्पन्न झाले.
सदरील गुन्हा हा करिष्मा सोनवणे व अमोल वारकर या दोघांनी केल्याचे समोर आले. पोलिसांनी महिलेस छत्रपती संभाजीनगर येथील ॲक्सिस बँकेतून ताब्यात घेतले तर वारकर याला खोपडी येथून ताब्यात घेतले. त्यांना सदरील गुन्ह्याबाबत विचारले असता, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पाच मोबाईलसह रोख रक्कम असा एकूण १ लाख ९१ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.