अंबड : अंबड बसस्थानकामध्ये शुक्रवारी सिल्लोडला जाणारी बस वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना धडकल्याची घटना घडली होती. या अपघातात पाचजण जखमी झाले होते, तर दोनजणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रिहान आलम शेख या दीड वर्षाच्या चिमुकल्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बस अपघातातील बळीची संख्या तीन झाली आहे.
यापूर्वी मुरलीधर आनंदराव काळे (वय ५०, रा. शेवगा) व शेख खलील (४०, शेख उल्ला, रा. जुना जालना) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शुक्रवारी अंबड आगारातून बसचालक व्ही. एस. राठोड याने सिल्लोडला जाण्यासाठी बस फलटावर लावण्यासाठी काढली होती. दुपारी सव्वाएकच्या सुमारात बस फलाट क्रमांक एकवर लावत असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती बस ३ नंबर फलाटावर असलेल्या प्रवाशांना जाऊन धडकली. या घटनेत सातजण गंभीर जखमी झाले होते. यानंतर उपचारादरम्यान दोघांचा त्याच दिवशी मृत्यू झाला. दरम्यान, शनिवारी रिहान आलम शेख यांचादेखील उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.