पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यास परवानगी; शिक्षण विभागाकडे अद्याप शासकीय पत्र अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:28 IST2021-01-18T04:28:20+5:302021-01-18T04:28:20+5:30
जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप ...

पाचवी ते आठवी वर्ग सुरू करण्यास परवानगी; शिक्षण विभागाकडे अद्याप शासकीय पत्र अप्राप्त
जालना : शासनाने २७ जानेवारीपासून पाचवी ते नववीचे वर्ग सुरू करण्याचा आदेश दिला आहे; परंतु याबबात शिक्षण विभागाला अद्याप लेखी पत्र प्राप्त झालेले नाही.
कोरोनामुळे चालू शैक्षणिक वर्षात चौथी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. काही शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून त्यांना घरी जाऊन शिक्षण देण्याचा उपक्रमही राबिवला आहे. शाळा केव्हा सुरू होणार? याबाबत पालक, विद्यार्थ्यांमध्ये असलेली उत्सुकता आता संपली आहे. एकीकडे शाळेत जाण्याची इच्छा असली तरी कोरोनाची भीती अनेकांच्या मनात आहे; परंतु नववी ते बारावी वर्ग आता नियमित सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची उपस्थिती ७० टक्क्यांच्या आसपास राहत आहे. सूचनांचे पालन झाल्याने एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही. त्यामुळे पाचवी ते आठवीचे विद्यार्थी, आणि पालक शाळा सुरू झाल्यानंतर कोणती भूमिका घेणार? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
नववी ते बारावीची सत्तर टक्के उपस्थिती
लॉकडाऊन शिथिलतेनंतर यापूर्वी नववी ते बरावीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले आहेत. प्रारंभीच्या काळात विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती; परंतु शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती आता सत्तर टक्क्यांहून अधिक राहत आहे. विशेष म्हणजे कोरोनातील सूचनांचे पालन केले जात आहे. त्यामुळे आजवर एकाही विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झालेली नाही.
शाळा सुरू करण्यापूर्वी शासकीय सूचनांचे पालन
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण शाळेची इमारत, वर्गखोल्यांसह परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे.
शासन निर्देशानुसार विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती ठेवली जाणार असून, कोरोनाबाबत शासन, प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार विद्यार्थी, शिक्षकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
विशेषत: शाळा सुरू होण्यापूर्वीच पाचवी ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांची कोरोना तपासणीही करून घेतली जाणार आहे.
शासकीय सूचनेनुसार काम
पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. अद्याप शासनाकडून लेखी पत्र आलेले नाही. शासनाचे पत्र प्राप्त होताच शासकीय सूचनांचे पालन करून शाळा सुरू होतील.
-कैलास दातखीळ,
शिक्षणाधिकारी
पाचवी ३८,४५२
सहावी ३७,९२१
सातवी ३६,९१८
आठवी ३६,०२७
जिल्ह्यातील शाळांची संख्या
१,८९४
जिल्ह्यातील शिक्षक संख्या
१२,२७५