निवडणूक प्रचारात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:40 IST2021-01-08T05:40:02+5:302021-01-08T05:40:02+5:30
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालसावंगी ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचारात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ...

निवडणूक प्रचारात आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी
वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालसावंगी ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचारात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर अनेकांनी आपला प्रभाग पिंजून काढला असून, मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर दिला जात आहे.
वालसावंगी ग्रामपंचायत निवडणुकीत सौंदर्याबाई भागाजी गवळी यांची बिनविरोध निवड झाली. आता १६ जागांसाठी तीन पॅनल व एक अपक्ष असे ४० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. यात १९ महिला उमेदवार तर २१ पुरुष उमेदवार उभे आहेत. तर तिघे अपक्ष आहेत. गावातील ठिकठिकाणच्या मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून अधिकृत प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अनेकांनी आपला प्रभाग पिंजून काढला असून, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात आला आहे. विशेषत: सत्ताधारी, विरोधकांकडून आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गावविकासाची अनेक आश्वासनेही मतदारांना दिली जात आहेत. दरम्यान, मागील पंचवार्षिकचे आठ सदस्य यंदाच्या निवडणुकीत पुन्हा उतरले आहेत. पंचवार्षिकमध्ये केलेल्या विकासकामांची माहिती हे सदस्य मतदारांना देत आहेत.
सोशल मीडियाचा प्रभावी वापर
गावातील उमेदवारांसह समर्थकांनी निवडणूक प्रचारात सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू केला आहे. फेसबूक, व्हाट्सअॅपचा अधिकाधिक वापर होताना दिसत आहे. विशेषत: युवा पिढीसह ज्येष्ठ मंडळींकडूनही सोशल मीडियाचा प्रभावी वापर प्रचारासाठी केला जात आहे.