कृषीचे क्रॉपसॅप ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान
By Admin | Updated: August 13, 2014 00:48 IST2014-08-13T00:07:03+5:302014-08-13T00:48:53+5:30
जालना : कृषी विभागाच्या जालना उपविभागातंर्गत चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकावरील रोग टाळण्यासाठी क्रॉप सॅप ( कीड व रोग सर्वेक्षण नियंत्रक)

कृषीचे क्रॉपसॅप ठरत आहे शेतकऱ्यांना वरदान
जालना : कृषी विभागाच्या जालना उपविभागातंर्गत चार तालुक्यांतील शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीन या पिकावरील रोग टाळण्यासाठी क्रॉप सॅप ( कीड व रोग सर्वेक्षण नियंत्रक) यांच्या मार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या योजनेतून उपविभागातील २० हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकाच वेळी माहिती देण्यात येत आहे.
पावसाची अनियमितता व खंडवृष्टी तसेच हवामानातील चढ उतारामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो. हा रोगांचा प्रादुर्भाव उद्भवू नये म्हणून शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार परिपूर्ण माहिती देण्याचे काम ही योजना करीत आहे. जालना उपविभागातील जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या चार तालुक्यांत १६ कीडरोग सर्वेक्षक आहेत. १२ हजार हेक्टरसाठी एक सर्वेक्षक यानुसार ही योजना तयार करण्यात आली आहे. साधारणपणे एका तालुक्यातील ४८ हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पिकांचे सर्वेक्षक रोगाचे सर्वेक्षण करतात. त्याचे नमुने तसेच माहिती जालना उपविभागीय कार्यालयात पाठविली जाते. ही माहिती आॅनलाईन पद्धतीने विद्यापीठ तसेच वरिष्ठ पातळीवर पाठविली जाते. रोगाचे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना कोणती औषधी फवारावी याची माहिती दिली. एसएमएसच्या माध्यमातून संबंधित परिसरातील शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर दिली जाते. पिकांवर रोग पडला तरी शेतकऱ्यांना त्याचा तात्काळ अटकाव करता येतो. उपविभागासाठी जी. एच. कच्छवे, व्ही.एस.वाघमारे यांची कीड रोग नियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
याविषयी अधिक माहिती देताना उपविभागीय कृषी अधिकारी पी.आर. देशमुख म्हणाले की, क्रॉपसॅप शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण योजना आहे. पिकावर किडरोग वाढण्याच्या आतच शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर तात्काळ मााहिती दिली जाते. आज रोजी काही भागात सोयाबीनवर ऊंट अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.
यासाठी लिंबोळी अर्क फवारण्याच्या सूचना शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे देण्यात आल्या आहेत. चार तालुक्यांत एकूण १८ कर्मचाऱ्यांकडून पीक परिस्थितीचा आढावा घेऊन दर आठवड्याला २० हजार शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. प्रत्येक शेतकऱ्याकडे जाणे कृषी विभागाला शक्य नाही. क्रॉपसॅपमुळे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती मिळत आहे. परिणामी कीडरोग नियंत्रणात राहत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत मिळते. (प्रतिनिधी)