कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:23 IST2021-01-10T04:23:57+5:302021-01-10T04:23:57+5:30
जालना : मध्य प्रदेशासह अन्य जिल्ह्यात बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. ...

कोरोनानंतर आता बर्ड फ्लूचा धोका वाढला
जालना : मध्य प्रदेशासह अन्य जिल्ह्यात बर्ड फ्लू आजार आढळून आला आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने सतर्कता बाळगून जिल्ह्यातील पोल्ट्री चालकांसह शेतकरी, कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांना दक्षतेबाबत सूचना दिल्या आहेत.
सध्या कोरोनामुळे जिल्ह्यातील नव्हे देशभरातील नागरिकांची झोप उडाली आहे. त्यात आता मध्य प्रदेशासह इतर काही राज्यांमध्ये बर्ड फ्ल्यू आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. शिवाय परभणी जिल्ह्यातही काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या नागरिकांसह पोल्ट्री फार्म चालकांनाही बर्ड फ्लू आजाराची लक्षणे, घ्यावयाची दक्षता याबाबत माहिती दिली जात आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचे रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, इतर राज्यांमध्ये रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर ही दक्षता घेतली जात असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. शिवाय आपल्याकडील पक्षांना कोणता आजार झाला किंवा पक्षी मयत झाला तर त्याची माहिती द्यावी, असे आवाहनही केले आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून अशी घेतली जाते काळजी
बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पोल्ट्री चालकांमध्ये जनजागृती केली जात आहे. या आजाराबाबत घ्यावयाची दक्षता सांगितली जात आहे.
एखाद पक्षी आजारी असेल तर त्याला इतर पक्षापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. शिवाय परिसर निर्जंतुकीकरण करावा.
पक्षांमध्ये कोणतेही आजार दिसून येत असतील तर तत्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून उपचार घेणे गरजेचे आहे.
मृत पक्षी आढळल्यास तत्काळ कळवा
पोल्ट्री फार्मवरील किंवा आपल्या घरातील, शेतातील एखादा पक्षी मृत पावला तर त्याची माहिती पशुवैद्यकीय विभागाला देणे गरजेचे आहे. पशुवैद्यकीय विभागातील तज्ज्ञांमार्फत मृत पक्ष्यांचे शवविच्छेदन केले जाते. याद्वारे त्या पक्ष्याचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला याची माहिती समजू शकते. त्यामुळे मृत पक्षाची माहिती प्रशासनाला देणे गरजेचे आहे.
जालना जिल्ह्यात एकाही पक्षाला बर्ड फ्लूची लक्षणे दिसून आली नाहीत. शिवाय मृत पक्ष्यामध्येही त्याची लक्षणे आढळलेली नाहीत. दक्षतेबाबत आवाहन केले आहे.
- शिवाजी कुरेवाड, उपायुक्त