क्वारंटाईन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने राखीव ठेवला अर्ध्या तासाचा वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:25 IST2021-01-15T04:25:46+5:302021-01-15T04:25:46+5:30
जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या ...

क्वारंटाईन नागरिकांच्या मतदानासाठी प्रशासनाने राखीव ठेवला अर्ध्या तासाचा वेळ
जालना जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच होम क्वारंटाईन असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने राखीव अर्ध्या तासाचा वेळ ठेवला आहे. ५ वाजेनंतर सर्व होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना मतदान करता येणार आहे. त्यांना तोंडाला मास्क बांधणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच सॅनिटायझरची व्यवस्थादेखील करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ४३४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
क्वारंटाईनसाठी मतदानाची वेळ राखीव
पाच वाजेपर्यंत नागरिक मतदान करतील. त्यानंतर गर्दी कमी झाल्यावर क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींना ५ ते ५.३० या वेळेत मतदान करता येणार आहे. मतदान करताना त्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर ठेवण्याचेही सांगण्यात आले आहे. क्वारंटाईन व्यक्तीची जबाबदारी ही केंद्राध्यक्षांकडे देण्यात आली आहे. इतरांनीही सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
क्वारंटाईसाठी सॅनिटायझरची केली व्यवस्था
क्वारंटाईन व्यक्तीला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रत्येक केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या व्यक्तीने मतदान केल्यानंतर मशीन सॅनिटायझरने साफ केली जाईल. केंद्राध्यक्षांसह इतर कर्मचाऱ्यांना वारंवार सॅनिटायझरने हात धुण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदानासाठी सुरक्षित अंतर पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
मास्क असताना ओळख पटणार?
क्वारंटाईन व्यक्तीला मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी गावातील ग्रामसेवकास विचारले जाणार आहे. त्यानंतरच संबंधित क्वारंटाईन व्यक्तीला मतदान करता येणार आहे.
शुक्रवारी ४४६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. यासाठी प्रशासन सज्ज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करूनच निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल. जिल्ह्यात होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींसाठी अर्ध्या तासाचा वेळ राखीव ठेवण्यात आला
आहे.
-निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा, कोट