कुठे शाळा, कुठे मंदिरातून गावचा कारभार; जालन्यात १७६ ग्रामपंचायतींना इमारतच नाही
By विजय मुंडे | Updated: July 13, 2023 07:05 IST2023-07-13T07:02:15+5:302023-07-13T07:05:01+5:30
मूलभूत सुविधा सोडा १७६ ग्रामपंचायतींनाच स्वत:ची इमारत नसल्याची दुर्दैवी बाब आहे.

कुठे शाळा, कुठे मंदिरातून गावचा कारभार; जालन्यात १७६ ग्रामपंचायतींना इमारतच नाही
जालना : एकीकडे डिजिटल इंडियाच्या माध्यमातून शहरी, ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या घोषणा शासन करीत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील १०-२० नव्हे तब्ब्ल १७६ ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारतीच नाहीत. परिणामी कुठे शाळेत बसून, कुठे मंदिरात बसून तर कुठे खासगी इमारतीचा वापर करीत गावाचा गाडा हाकण्याची वेळ गावकारभाऱ्यांवर आली आहे. विशेषतः पाठीवर दप्तर घेऊन ग्रामसेवकांना फिरावे लागत असून, गावाच्या विकासाला गती मिळणार कशी अन् डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण होणार कसे असाच प्रश्न यानिमित्ताने समोर येत आहे.
जिल्ह्यातील अनेक गावखेड्यात अद्याप मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. मूलभूत सुविधा सोडा १७६ ग्रामपंचायतींनाच स्वत:ची इमारत नसल्याची दुर्दैवी बाब आहे. कृषी, पशुसंवर्धन, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य, रस्ते, ग्रामोद्याेग, सहकाराच्या विविध योजना गावस्तरावर राबविण्यात ग्रामपंचायतींची भूमिका महत्त्वाची असते. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता यासह इतर बाबींवर ग्रामपंचायतीकडून कामकाज केले जाते. परंतु, ही कामे करण्यासाठी मासिक बैठका घ्याव्या लागतात. या बैठका घेण्यासाठी जागाच नसेल तर गाव कारभारी आणि अधिकाऱ्यांची मोठी पंचायत होते. अशीच स्थिती जिल्ह्यातील १७६ गावांची आहे. ग्रामपंचायतीला इमारत नसल्याने कुठे शाळेच्या खोलीत, कुठे मंदिरात तर कुठे अंगणवाड्यांच्या इमारतीत बसून गावाचा कारभार हाकण्याची वेळ अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर आली आहे. विशेषतः डिजिटल इंडियाचे स्वप्न शासन पाहत असले तरी या ग्रामपंचायतींत संगणकाचाही पत्ता नाही. महत्त्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी खोली किरायाणे घेण्याची वेळ अनेक ग्रामपंचायतींवर आली आहे. अशा स्थितीमुळे गावांच्या विकासाला ब्रेक लागला असून, याकडे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिला
ग्रामपंचायतीची इमारत नसल्याने मासिक बैठका हनुमान मंदिरात होतात. इमारतीअभावी कामकाजात अडचणी येत असून, इमारत उपलब्ध व्हावी, यासाठी सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव दिला आहे.
- अर्चना झाेल, सरपंच, रामतीर्थ, ता. मंठा
कामात अडचणी येतात
ग्रामपंचायत इमारतीचे काम २०२१ पासून रखडले आहे. त्यामुळे मासिक बैठका शाळेच्या खोलीत घ्याव्या लागतात. कामात अडचणी येतात. ग्रामपंचायत इमारतीचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- विमल आठवे, सरपंच, मापेगाव (बु.)
सुसज्ज इमारतीची मागणी
ग्रामपंचायतीची एकच खोली आहे. त्यात संगणक रूम, बैठक हॉल, पदाधिकाऱ्यांच्या बसण्याची व्यवस्था आहे. अपुऱ्या जागेमुळे कामात अडथळे निर्माण होत असून, सुसज्ज इमारतीची मागणी केली आहे.
संगीता राठोड, सरपंच, येवला
इमारत नसलेल्या ग्रामपंचायती
तालुका ग्रामपंचायती
जालना- २४
बदनापूर- १५
अंबड- २१
घनसावंगी- ३२
परतूर- १६
मंठा- २८
भोकरदन- २७
जाफराबाद- १३