प्रशासकीय सूचनांचे पालन अन् स्वयंशिस्तीने आडगाव भोंबे गावाला केले कोरोनामुक्त...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:31 IST2021-08-23T04:31:57+5:302021-08-23T04:31:57+5:30
भोकरदन : ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने एकत्रित काम केले, तर कोरोनासारख्या महामारीवर मात करता येते, याची प्रचिती आडगाव भोंबे ...

प्रशासकीय सूचनांचे पालन अन् स्वयंशिस्तीने आडगाव भोंबे गावाला केले कोरोनामुक्त...!
भोकरदन : ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि प्रशासनाने एकत्रित काम केले, तर कोरोनासारख्या महामारीवर मात करता येते, याची प्रचिती आडगाव भोंबे गावाकडे पाहिल्यानंतर येते. प्रशासकीय सूचनांचे पालन आणि स्वयंशिस्तीने या गावाने कोरोनामुक्तीपर्यंत मजल मारली आहे.
५७६ उंबरठे आणि तीन हजार लोकसंख्येचे आडगाव भोंबे गाव आहे. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आणि या गावातील यंत्रणा सतर्क झाली. सरपंच कौशल्या सारंगधर भोंबे, ग्रामसेवक के. एस. राऊत यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर, साबण नित्य नियमाने वापरण्याच्या सूचना दिल्या. नव्हे ग्रामपंचायतीने साबण, मास्कचेही ग्रामस्थांना वाटप केले. गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. एम. चंदेल यांच्याकडून येणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी सरपंच भोंबे, ग्रामसेवक राऊत यांनी सर्वांना सोबत घेऊन केली. परिणामी, मागील दीड - दोन वर्षांत गावात २९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. परंतु इतर ग्रामस्थांनी सूचनांचे पालन केल्याने आणि ग्रामपंचायतीने सर्व त्या उपाययोजना राबवल्याने गाव कोरोनामुक्त झाले.
अव्वल कामगिरी
याच कामगिरीच्या जोरावर हे गाव पालकमंत्री राजेश टोपे यांच्या संकल्पनेतून कोरोना काळात उत्कृष्ट काम करण्यात अव्वल ठरले आहे.
या गावाप्रमाणेच नळणी बु. (द्वितीय) व खामखेडा (तृतीय) या ग्रामपंचायतींनीही कोरोनाला रोखण्यात यशस्वी कामगिरी बजावून गाव कोरोनामुक्त केले आहे.
ग्रामस्थांचे सहकार्य, प्रशासकीय सूचना आणि राजकारणविरहीत काम करून आम्ही कोरोनावर मात केली आहे. यापुढील काळातही आम्ही अशाच पद्धतीने गावात उपाययोजना राबवून कोरोनाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सूचनांचे पालन करणे हे सर्वांत महत्त्वाचे असून, सूचनांचे पालनच आपल्याला कोरोनापासून दूर ठेवण्यास मदत करणार आहे.
- कौशल्या भोंबे, सरपंच
वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांची ग्रामपंचायतीसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी अंमलबजावणी केली. ग्रामस्थांनीही प्रशासकीय सूचनांचे पालन केले आहे. स्वच्छता, निर्जंतुकीकरण यांसह इतर विविध उपाययोजनांमुळे आम्ही गावाला कोरोनामुक्त करू शकलो. यापुढेही गावात कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रयत्न केले जातील.
-के. एस. राऊत, ग्रामसेवक
गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले. आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. संशयितांचे अलगीकरण करण्यावर भर दिला. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत संबंधितांना अलगीकरणात जेवणाचा डबा देण्यात आला. सर्वांनी एकत्रित काम केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सर्वांनी सूचनांचे पालन करावे.
-डॉ. महेश पिसोळे
ग्रामस्थांनी अशी घेतली दक्षता
बाहेरगावांतून येणाऱ्यांची तपासणी, अलगीकरणासाठी स्वतंत्र सोय, ग्रामस्थांच्या आरोग्याचे सर्वेक्षण, मास्क, सॅनिटायझर, साबणाचा वापर केला.
सर्व प्रशासकीय सूचनांचे पालन करून या गावाने आजवर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच लसीकरणावर भर दिला आहे.