जयदेववाडी येथे आणखी १८ रुग्णांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:46 IST2021-02-23T04:46:38+5:302021-02-23T04:46:38+5:30
जयदेववाडी हे महानुभाव पंथाचे मोठे देवस्थान आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या दर्शनासाठी परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे ...

जयदेववाडी येथे आणखी १८ रुग्णांची वाढ
जयदेववाडी हे महानुभाव पंथाचे मोठे देवस्थान आहे. या ठिकाणी चक्रधर स्वामी यांच्या दर्शनासाठी परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे आरोग्य विभागाने या गावात नागरिकांची तपासणी करण्यासाठी चार पथके तैनात केली आहेत. शिवाय कोरोना चाचणी करण्यासाठी दोन पथके आहेत. मात्र, चाचणी करण्यासाठी नागरिक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभाग हतबल झाला आहे. या ठिकाणच्या बहुतांश आश्रमात १०० ते २०० जण वास्तव्यास आहेत. ते तपासणीसाठी टाळाटाळ करीत आहेत, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. चंदेल यांनी सांगितले. येथे १८ फेब्रुवारी रोजी २३ आणि १९ फेब्रुवारी रोजी ३१ असे एकूण ५४ रुग्ण आढळले आहेत. २१ फेब्रुवारी रोजी आणखी १८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. १५० जणांचे अहवाल येणे बाकी आहे. त्याचप्रमाणे ३५८ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली आहे.
एकत्र भोजनामुळे संसर्ग वाढला
जयदेववाडी येथील प्रत्येक आश्रमात जेवणासाठी एकत्र पंगत दररोज होतात. शिवाय सर्वजण नंतरसुध्दा सोबत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. येथील एकत्र भोजन थांबविण्यात यावे, असे चंदेल यांनी सांगितले. या गावात जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत यांनी भेट दिली आहे.