The addict father killed Kelly's son's son | व्यसनी पित्याने केली पोटच्या मुलाची हत्या
व्यसनी पित्याने केली पोटच्या मुलाची हत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आपला पोटचा मुलगा चारचौघात आपला अपमान करायचा, तसेच कर्ज चुकवण्यासाठी घर विक्री करण्यास विरोध करायचा यामुळे याचा राग मनात धरुन दारुच्या व्यसनी गेलेले वडील हनुमान कुरधने यांनी मुलगा संतोष याचा (वय २२) झोपेत असतानाच त्याच्यावर लोखंडी गजाने अनेक वार करुन खून केला.
ही घटना बुधवारी बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे सकाळी उघडकीस आली होती. घराच्या बाहेर सापडलेल्या दोन दारुच्या बाटल्या आणि चार ते पाच उकडलेल्या हरभऱ्याच्या दाण्यांवरून पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. या प्रकरणी मयताचा पिता हनुमान कुरधने याला चोवीस तासांत अटक केली. आपणच मुलाचा खून केल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली.
मूळचे नंदापूर (ता. जालना) येथील रहिवासी असलेले कुरधने कुटुंब १० वर्षांपासून रामखेडा येथे मजुरीसाठी स्थायिक झाले आहे. आई-वडील शेजारील कुटुंब बाहेरगावी गेल्यामुळे त्यांच्याकडे झोपण्यासाठी गेले होते.मंगळवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास हनुमान कुरधने हे झोपेतून उठून आपल्या घरी गेले. खून करण्याआधी त्याने घराच्या वट्यावर सोबत असलेली दारु प्राशन केली. तसेच सोबत आणलेला ‘चकणा’ फस्त केला. दारुची नशा चढल्याने त्याने हिमतीने दरवाजा वाजवून मुलगा संतोष याला आवाज दिला. झोपेत असलेल्या संतोष याने दरवाजा उघडून लगेच अंगावर पांघरूण घेऊन झोपला. हीच संधी साधून आरोपी हनुमंत कुरधने याने घरात ठेवलेला लोखंडी गज काढून झोपेत असलेल्या आपल्या पोटच्या मुलाच्या डोक्यावर सपासप वार केले. मुलगा रक्ताच्या थारोळयात पडताच हनुमंत याने घटनास्थळावरुन पळ काढला शेजारच्या गच्चीवर परत झोपण्यासाठी गेला. इकडे तडफडून मुलगा ठार झाला होता. सकाळी मयत संतोष कुरधने याची बहीण घरी आली असता आपला भाऊ रक्ताच्या थारोळ्यात दिसल्याने तिने टाहो फोडला. आरोपी हनुमान आणि त्याच्या पत्नीने घर गाठले.यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. छोट्याशा गावात खून झाल्याने गावात खळबळ उडाली होती.
याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, समाधान पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, बदनापूरचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोंदकर, एडीएसचे यशवंत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता.
एकूणच पोलिसांच्या या झटपट व यशस्वी तपासकार्यामुळे आरोपी जेरबंद झाला आहे.
असा झाला खुनाचा उलगडा
उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या पथकाने या खुनाचा छडा लावण्यासाठी बारकाईने तपास केला. घटनास्थळी सापडलेल्या दारुच्या दोन बाटल्या आणि उकडलेल्या हरभ-याचे दाणे यावरुन पोलिसांनी तपास केला.बदनापूर येथील एका देशी दारुच्या दुकानाबाहेरच फक्त उकडलेले हरभरे मिळतात.
हाच धागा पकडून पोलिसांनी चणे विकणा-याकडून चौकशी केली असता सदर आरोपी हनुमंत कुरधने याने मंगळवारी रात्री आपल्याकडून उकडलेले चणे खरेदी केल्याची माहिती दिल्यानंतर संतोष कुरधनेचा खून त्याच्या पित्यानेच केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
जावयासमोर अपमान केला अन्...
लहानपणापासून माझ्या मुलाला मोलमजुरी करुन मोठे केले, त्याच्या आजारावर लाखो रुपयांचा खर्च केला. असे असताना त्याने वेळोवेळी गावातील नागरिकांसमोर माझा अपमान केला.
अनेकवेळा दारु पिऊन आल्यास मला जेवू देत नसत, माझा जावई घरी आला असताना त्याने जावयासमोर शिवीगाळ करुन मला मारहाण केली होती, असे आरोपीने सांगितले.


Web Title: The addict father killed Kelly's son's son
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.